नागपूर येथे ‘वन भवन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि. 18 : ‘वन भवन’ या वन विभागाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

वन विभागाचे सुसज्ज कार्यालय या इमारतीत सुरु करण्यात येत असून नव्या इमारतीत हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या आगमन प्रसंगी वनमंत्री मुनगंटीवार यांनी वृक्ष रोप देऊन मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर इमारतीजवळच्या सेल्फी पॉईंटवर तिघा मान्यवरांनी आपले छायाचित्र घेतले. व्याघ्रसंरक्षण दलाने मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर फित कापून व कोनशिला अनावरण करुन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याचा वनविभाग हा देशात सर्वोत्कृष्ट काम करणारा विभाग आहे. राज्यात वनक्षेत्राचा लक्षणीय विस्तार करण्याचे काम या विभागाने केले आहे. या नूतन इमारतीत वन विभागाची सर्व प्रमुख कार्यालये एकाच छताखाली आल्याने प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सोय झाली आहे.

या कार्यक्रमास लोकसभा सदस्य खा.कृपाल तुमाने, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती मुक्ता कोक्कड्डे विधानसभा सदस्य आ. ॲड.आशीष जयस्वाल, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल. पी. राव, नागपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उप वनसंरक्षक डॉ भारतसिंह हाडा आदी उपस्थित होते.

असे आहे ‘वन भवन’…

ही इमारत नागपूर शहराच्या सिव्हिल लाईन्स भागात ५६२५.०० चौ मी क्षेत्रफळ जागेवर स्थित आहे. इमारतीचे बांधकाम याप्रमाणे- तळमजला-१६९७.७२चौ मी,पहिला मजला -१५४८.१५ चौ मी., दुसरा मजला-९६७.७७ चौ मी, तिसरा मजला ९६७.७७ चौ मी. असे एकूण ५१८१.१९चौ मी बांधकाम आहे. या कामासाठी आतापर्यंत २६कोटी ५ लक्ष ४० हजार रुपये निधी खर्च झाला आहे.ही सुसज्ज इमारत अत्यंत देखणी असून सर्व सोयीने युक्त आहे.या एकाच इमारतीत वन विभागाची २० कार्यालये स्थापित आहेत.याशिवाय महिला कर्मचारी विश्राम कक्ष, वाहन चालक विश्राम कक्ष, उपहार गृह, संगणक नियंत्रण कक्ष इ सुविधा या इमारतीत स्थापित करण्यात आल्या आहेत. इमारतीच्या अंतर्गत सजावटीत वन्यजीवांची छायाचित्रे, पेंटींग्ज इ. सुरेख वापर करण्यात आला आहे. या शिवाय वनांच्या संवर्धनासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्रही दर्शनी भागात लावण्यात आले आहे.

०००००