विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद उपसभापतींची सुयोग पत्रकार निवासस्थानी भेट
नागपूर, दि. 19 : महाराष्ट्र विधिमंडळाचा गुणात्मक दर्जा हा देशात सर्वात उत्तम असून त्यात आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. आगामी वर्षात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विधिमंडळाचे कामकाज हे डिजिटलायझेशन पध्दतीने करण्यात येईल, असे विधानसभचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना सांगितले.
हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर येथे आलेल्या पत्रकारांशी त्यांनी सुयोग पत्रकार निवासस्थानी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
विधिमंडळ कामकाजात भविष्यात मोठे बदल करण्यात येतील, असे सांगून अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले, विधिमंडळाच्या सदस्यांना विश्वासात घेऊन पेपरलेस व प्रभावशाली कामकाज करण्यात येईल. तसेच 1937 पासूनच्या विधिमंडळातील चर्चा, भाषणे, लायब्ररी डाटा एका क्लिकवर उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. अधिवेशन किती कालावधीचे आहे, यापेक्षा कामकाज किती झाले, हे जास्त महत्त्वाचे आहे. अधिवेशन जास्त कालावधीचे असले आणि वेळ वाया जात असेल, तर त्याला अर्थ नाही. उलट लोकहिताच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा करून विधेयके पारित करणे. कामकाजाचा वेळ वाया न जाऊ देणे, या बाबीला जास्त महत्त्व असते. अलिकडच्या काळात पाहिजे तेवढ्या प्रमाणात सभागृहात चर्चा होत नाही.
वार्तांकनासाठी विधिमंडळाच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये पत्रकारांसाठी योग्य व्यवस्था करण्यात येईल. एवढेच नाही तर पत्रकारांच्या ज्या काही अडचणी असतील, त्या सोडविण्यासाठी संबंधिताना सुचना देण्यात येतील. गत अधिवेशनात रोज 14 ते 15 लक्षवेधी असायच्या. यावेळी सुध्दा असेच कामकाज करण्यावर भर आहे. सकाळी 9 ते 10.45 या वेळेत विधिमंडळात विशेष व्यवस्थेंतर्गत चर्चा करून सभागृह नियमाप्रमाणे चालायला पाहिजे, असाच कटाक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.
विधेयके, चर्चा हा अधिवेशनाचा आत्मा : उपसभापती नीलम गोऱ्हे
गत 20 वर्षांपासून आपण विधिमंडळाचे कामकाज बघत आहोत. नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा करणे, लोकहिताचे विधेयके पारित करणे हा अधिवेशनाचा खरा आत्मा आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
विधिमंडळ कामकाजासाठी मुंबई येथून आलेल्या पत्रकारांशी सुयोग पत्रकार निवास येथे संवाद साधतांना त्या बोलत होत्या. या अधिवेशनात चांगले कामकाज करण्याबाबत विश्वास व्यक्त करून त्या म्हणाल्या, विदर्भातील तसेच इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर चांगली चर्चा अपेक्षित आहे. विधिमंडळाच्या चौकटीत चांगले काम करण्याचा प्रयत्न आहे. पीठासीन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिलेले निर्देश पाळण्याचे बंधन त्यांच्यावर असून त्याचा अहवाल वेळेत सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर दिलेल्या सुचनांचे 99 टक्के पालन झाल्याचेही त्यांनी सांगितले.
विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, सुयोग शिबिरप्रमुख विवेक भावसार, मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर आदी यावेळी उपस्थित होते.
000