विधानपरिषदेत दिवंगत मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

नागपूर, दि. 23 : विधानसभेच्या सदस्या मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्यांना विधानपरिषदेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेला शोक प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

या शोकप्रस्तावात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, दिवंगत मुक्ता शैलेश टिळक यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६५ रोजी मध्यप्रदेश राज्यातील ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे शिक्षण एम. ए. (मानसशास्त्र), डी. बी. एम., डी. एम. एम. पर्यंत झाले होते. दिवंगत टिळक यांनी आनंदवन मित्र मंडळाच्या अध्यक्षा, लोकमान्य टिळक विचार मंचच्या विश्वस्त म्हणून कार्य केले. त्यांनी इंटरनॅशनल लेप्रसी युनियनच्या उपाध्यक्षा, पुणे येथील प्रेरणा महिला मंडळाच्या संस्थापिका तसेच दृष्टी महिला विचार मंचच्या कार्यकारिणी सदस्या म्हणूनही उत्तम कार्य केले होते. लोकमान्य दैनंदिनीच्या त्या संपादिका होत्या.

दिवंगत टिळक या भारतीय जनता पक्ष पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा म्हणूनही कार्यरत होत्या. सन २००२ ते २०१९ या कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या सदस्या, तसेच सन २०१७ ते २०१९ या कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या महापौर होत्या. त्या सन २०१९ मध्ये पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाल्या होत्या. त्यांनी गौरवशाली काम केले होते, असेही डॉ. गोऱ्हे यांनी शोकप्रस्तावात म्हटले.

००००

धोंडिराम अर्जुन/ससं/