४ ते ६ जानेवारीदरम्यान होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहावे – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

नागपूर, दि. २९ : मराठी भाषेचे संवर्धन व जगभर प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आणि सांस्कृतिक कार्य व उद्योग विभागाच्या सहकार्याने दि. ०४, ०५ व ०६ जानेवारी २०२३ रोजी नॅशनल स्पोर्टस् स्टेडियम, वरळी, मुंबई येथे मराठी विश्व संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांनी सदर कार्यक्रमाच्या तीनही दिवशी सहभागी व्हावे, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली.

ॲड. नार्वेकर म्हणाले, “या संमेलनात जगातील वेगवेगळ्या खंडातील २० देशांमधील विविध शहरांतून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संघटनांचे ४९८ प्रतिनिधी व त्याचप्रमाणे भारतातील विविध शहरांत राहणाऱ्या व मराठी भाषेच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्थांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत”.

मराठी संस्कृती व मराठी भाषा यांचेबाबत चर्चासत्र, मराठी संस्कृतीचे प्रदर्शन करणारे नाट्यसंगीत, वादन इ. विविध कलांचा अविष्कार त्याचप्रमाणे विविध चर्चासत्रांचे दि. ०४ ते ०६ जानेवारी २०२३ या कालावधीत नॅशनल स्पोर्टस् स्टेडियम, वरळी, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे.

“या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध उद्योग महाराष्ट्रामध्ये यावेत याकरिता गुंतवणूकदार व उद्योजक यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दि. ०६जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे मराठी उद्योजक व गुंतवणूकदार यांचा परस्पर संवाद होणार आहे.

दि. ०४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभाचे उद्घाटन करण्याचे नियोजित आहे”, अशी माहिती ॲड. नार्वेकर यांनी दिली.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/