विज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे – शेखर मांडे

0
6

नागपूर, दि.6 : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्यामुळेच आपला समाज खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, असे प्रतिपादन डॉ. शेखर मांडे यांनी आज येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपपूर विद्यापीठात भारतीय विज्ञान काँग्रेस आयोजित करण्यात आली आहे. आजच्या चौथ्या दिवशी सकाळी विज्ञान आणि समाज या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या महासचिव डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना होत्या. प्रमुख वक्ते सीएसआयआरचे माजी संचालक शेखर मांडे, शिवकुमार राव तसेच कुलगुरु डॉ.सुभाष चौधरी, समन्वयक डॉ. सी.सी. हांडा,डॉ. एस. रामकृष्ण आदी मान्यवर उपस्थित होते.

शेखर मांडे म्हणाले की, विज्ञान समाजाच्या प्रगतीला मदत करु शकते. 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा चर्मोद्योगात आपल्या देशातील 25 हजार लोक सहभागी होते. मात्र या उद्योगाच्या प्रक्रिया, उत्त्पादन इ. घटकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झाल्याने आज आपण या उद्योगातील मोठे निर्यातदार आहोत. जवळपास 50 लाखांहून अधिक लोक या व्यवसायाशी निगडीत आहेत. थोडक्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे लाभ हे सामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यातूनच प्रगती साध्य होऊ शकते. याबाबत अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले की, देवळांमध्ये तसेच अन्यत्र पूजाविधीत वापरल्या जाणाऱ्या फुलांना नंतर निर्माल्य म्हणून पाण्यात सोडून दिलं जातं. हे नक्कीच हितावह नाही. म्हणून अशा फुलांवर प्रक्रिया करुन त्यापासून सुगंधी द्रव्ये, अगरबत्त्ती, रंग निर्मिती केल्यास लाभ होईल. असाच उपक्रम सध्या शिर्डी येथे सुरु असून त्यात 5 हजार महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नागपूर शहरातही असा प्रकल्प सुरु करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिवकुमार राव यांनी सांगितले की, समाज हा विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विकासाचा लाभार्थी असतो. विदर्भात दुग्धव्यवसाय आणि मासेमारी सारख्या व्यवसायाला वाव आहे. यात आधुनिक तंत्राचा तसेच माश्यांच्या चांगल्या प्रजाती मिळाल्यास, त्याची साठवणूक, दुग्ध प्रक्रिया याबाबत चांगले व लघु प्रकल्प मिळाल्यास विकासाला चांगली गती मिळू शकेल.

अध्यक्षीय भाषणात डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना म्हणाल्या की, शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान आणि समाज यांच्यातील घनिष्ठ संबंधांची गरज आहे.

प्रास्ताविक कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विज्ञान आणि समाज या ई- स्मरणिकेचे अनावरणही करण्यात आले. समन्वयक सी.सी.हांडा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आभार डॉ. उज्ज्वल गुल्हाणे यांनी मानले.

नोबेल विजेत्या प्रा.ॲडा योनाथ यांची विशेष उपस्थिती

नोबेल पुरस्कार प्राप्त इस्त्रायलच्या ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ प्रा.ॲडा योनाथ यांनी या परिसंवादाला आवर्जून भेट दिली. नोबेल पुरस्कार मिळण्यापूर्वीपासूनच त्यांचा भारताशी स्नेह आहे. चेन्नईतील शास्त्रज्ञांसोबत काम केले आहे. आपल्या उत्साहाचे रहस्य काय? असे विचारले असता त्यांनी हा उत्साह ‘सिक्रेट’ असल्याचे गंमतीशीरपणे सांगितले.

00000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here