जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि संशोधकांची भूमी आहे. याप्रमाणेच संपत्ती निर्माण करणाऱ्या मराठी माणसाची देखील भूमी आहे. महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याची जबाबदारी जगभरातील मराठी माणसाची आहे. जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे आयोजित ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, मराठी भाषा व शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह श्रीमंत सरदार सरदेसाई, श्रीमती धनश्री सरदेसाई, जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक,  बीएमएफ चे अध्यक्ष संदीप दीक्षित, जर्मन कौन्सुलेटचे प्रतिनिधि डॉ. चव्हाण, श्री. आनंद गानू , श्री विजय पाटील यांसह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विश्व मराठी संमेलनाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाचे कौतुक करून केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले मराठी संस्कृतीचे महत्त्व आपण बाहेर देशात असताना प्रभावीपणे जाणवते. आज विविध क्षेत्रांत मराठी माणूस पुढे गेलेला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान तसेच विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याबरोबरच शक्तिशाली अर्थव्यवस्था निर्माण करण्यामध्ये विदेशात असलेल्या भारतीयांचे योगदान खूप मोठे आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी माणसाने महाराष्ट्रामध्ये  गुंतवणूक केली, येथील उद्योजकता वाढवली तर महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मंत्री श्री गडकरी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आपल्या सगळ्यांना मिळून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टया मागासलेल्या  ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा प्रामुख्याने विचार करावा लागणार आहे. यासाठी पाणी, वीज, दळण वळण आणि संपर्क साधने यावर विशेष भर द्यावा लागणार आहे. या सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी उद्योग विकासाला मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्र शासनाने उद्योगक्षेत्राच्या विकासासाठी धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यायोगे ग्रामीण महाराष्ट्रात उद्योगविकासाला चालना मिळेल, असा विश्वासही श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला”. महाराष्ट्राचे आणि मुंबईचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. परंतु मराठी माणसाने केवळ नोकरी करणारा न होता नोकरी देणारा होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करायला हवेत. आपण सकारात्मक विचार ठेवून हिमतीने व्यवसायात उतरले पाहिजे”, असेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.

राज्यात उद्योगांचे विकेंद्रीकरण झाल्याशिवाय ग्रामीण महाराष्ट्र विकसित होणार नाही. गावही समृद्ध झाले पाहिजे, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी विषद केली. “मुंबई हा देशाच्या आर्थिक विकासाचा केंद्र बिंदू आहे. महाराष्ट्र शासनाने विविध क्षेत्राचा अभ्यास करून त्यांच्या विकासासाठी कालबद्ध नियोजन करावे”, असेही श्री.गडकरी यांनी यावेळी सांगितले. तसेच नवउद्योजक यांना सोयी-सुविधा या वीहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भारत देश हा सर्वात मोठा निर्यातदार देश होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषा, मराठी माणसांचे उद्योगातील योगदान आणि त्यांच्या केंद्रातील विविध खात्यांमार्फत सुरु असलेल्या विकास कामांबाबत त्यांनी माहिती दिली.

जगभरातील महाराष्ट्रीयन उद्योजकांचे राज्यात स्वागत – उद्योगमंत्री उदय सामंत

“जगभरातील मराठी उद्योजकांचे महाराष्ट्रात विशेष स्वागत आहे, त्यांच्यासाठी नेहमीच रेड कार्पेट वागणूक दिली जाईल”, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विश्व मराठी संमेलनात आज तिसऱ्या दिवशी मराठी उद्योजकांसमवेत विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलतांना श्री सामंत पुढे म्हणाले, महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देश पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि त्या उद्योजकांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येऊन उद्योग सुरू करायचा असेल, व्यवसाय वाढवायचा असेल तर तुमच्यासाठी एक नवीन धोरण उद्योग विभागामार्फत बनवले जाईल आणि राजाश्रय महाराष्ट्र सरकारकडून दिला जाईल”, अशी ग्वाही श्री सामंत यांनी दिली.

“आज महाराष्ट्रामध्ये नऊ लॉजिस्टिक पार्क होत आहेत. केंद्र सरकारची ताकददेखील राज्याच्या पाठीशी आहे. तुमच्या ज्या काही अपेक्षा महाराष्ट्राच्या सरकारकडून आहेत, उद्योग विभागांडून त्या पूर्ण केल्या जातील. आपल्या व्यवसायासाठी जर महाराष्ट्रामध्ये एमआयडीसीची जागा पाहिजे असेल तर ती तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल.

मैत्री नावाचा एक चांगला कायदा आम्ही आणतोय. उद्योगांना लागणाऱ्या सार्वजनिक परावानग्या या 30 दिवसाच्या आत दिल्या जातील आणि बाकीच्या खात्यांवर देखील त्यासाठी बंधन राहील”, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

पुढचे संमेलन यापेक्षा भव्य असेल – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, मराठी भाषेचा आणि मराठी संस्कृतीचा प्रचार प्रसार होत असताना आपले प्रत्येकाचे त्यामध्ये योगदान आवश्यक आहे. ही संस्कृती जपणे हे महाराष्ट्र शासनाचे काम आहे. त्यामुळे दरवर्षी विश्व संमेलन आयोजित करण्यात येईल. तसेच पुढचे विश्व संमेलन याच्यापेक्षा अधिक भव्य असेल, असा विश्वास त्यांनी जगभरातून आलेल्या मराठी माणसांना दिला. तसेच जगभरातील मराठी भाषिकांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी “मराठी तितुका मेळवावा” विश्व मराठी संमेलन आयोजनामागची भूमिका विषद केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध देशांतील गौरवपूर्ण कार्य करणाऱ्या मराठीजनांचा सत्कार करण्यात आला.

00000

मनीषा पिंगळे/विसंअ/6.1.2022