आता चर्चा महिलांच्या कर्तृत्वाची व्हावी – डॉ.द्रिती बॅनर्जी

नागपूर, दि. 6 : देशातील महिलांनी मेहनतीच्या बळावर विविध क्षेत्रातील सर्वोच्च पदे प्राप्त केले आहे. स्वबळावर विविध क्षेत्रात त्या नावलौकिक मिळवित आहे, सातत्याने पुढे जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या कर्तृत्वावर चर्चा व्हावी, असे आवाहन कोलकाता येथील भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या संचालक डॉ.द्रिती बॅनर्जी यांनी केले.

भारतीय विज्ञान काँग्रेस निमित्त आयोजित महिला विज्ञान काँग्रेसच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ डॉ.अदा योनथ, डॉ.हॅगीथ योनथ, राष्ट्रीय फार्मास्युटिकल शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संचालक डॉ.शशी बाला सिंग, भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना, सचिव डॉ.एस.रामकृष्णन, महिला विज्ञान काँग्रेसच्या संयोजक डॉ.कल्पना पांडे आदी यावेळी उपस्थित होत्या.

भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या 105 वर्षाच्या इतिहासातील डॉ.द्रिती बॅनर्जी या पहिल्या महिला संचालक आहे. पुढे त्या म्हणाल्या, वैदीक काळात महिला सर्वच क्षेत्रात पुढे होत्या. समाजाला पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्या सक्षमपणे ही जबाबदारी पार पाडत होत्या. नंतरच्या काळात मात्र त्या चुल आणि कौटुंबिक जबाबदारीत बांधल्या गेल्या आणि समस्या निर्माण झाल्या. आता महिलांनी स्वबळावर पुन्हा विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. कोणतेही क्षेत्र शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे  आता त्यांच्या कर्तृत्वावर चर्चा झाली पाहिजे,असे डॉ.बॅनर्जी म्हणाल्या.

महिलांना मुक्तपणे विविध क्षेत्रात जाता आले पाहिजे. यासाठी तिच्यावर असलेल्या जबाबदारीचे विभाजन होणे आवश्यक आहे. महिला म्हणून ती करत असलेल्या काही कामांची जबाबदारी पुरुषांनी स्विकारावी. महिलांनी स्वत:वर विश्वास ठेवावा. प्रत्येक गोष्ट मी करु शकते हा आत्मविश्वास असला पाहिजे. आताची महिला सर्वच क्षेत्रात नेतृत्वाची भूमिका बजावत आहे, असे डॉ.बॅनर्जी यांनी सांगितले.               डॉ.शशी बाला सिंग म्हणाल्या, महिलांनी आव्हाने स्विकारली पाहिजेत. संसाधनांचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याचा विचार करावा. महिलांना त्या स्वत:च पुढे नेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी स्वत:शीच स्पर्धा करावी.

डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना म्हणाल्या, महिला शास्त्रज्ञांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने त्यांना आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्याची व त्यावर मंथन करण्याची संधी मिळते. महिलांनी सर्वच क्षेत्रात पुढे गेले पाहिजे.               नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ डॉ.अदा योनथ यांनी, ‘विज्ञान तंत्रज्ञानाचे क्षेत्र हे पुरुषांसह महिलांसाठीही तितकेच खुले आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांना उत्तम काम करण्याची संधी आहे. खऱ्या अर्थाने जगभर महिला सक्षमीकरणाचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक संयोजक डॉ.कल्पना पांडे यांनी केले.

या आयोजनात देशातील विविध विद्यापिठे, महाविद्यालयातून आलेल्या महिला शास्त्रज्ञांनी आपल्या नाविन्यपुर्ण संकल्पना, यशोगाथा सादर केल्या. विज्ञान काँग्रेसच्या द्वितीय आणि अंतिम सत्रात देशभरातील महिला शास्त्रज्ञ, डॅाक्टर्स, प्राध्यापक, अधिव्याख्याता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचलन व आभार डॉ.मंजु दुबे यांनी केले.

00000000