शरीर, मन आणि बुद्धीसाठी खेळ आवश्यक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.२७ – महाराष्ट्र मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आयोजित आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन अडथळ्यांचा शर्यतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला संस्थेचे सरचिटणीस रोहन दामले, महाविद्यालयाचे प्राचार्य सोपान कांगणे, शिक्षण विभाग संचालिका नेहा दामले उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, अडथळ्यांचा शर्यतीत भाग घेणे आणि त्यासाठी सराव करणे हे मोठे धाडस आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करणे आनंददायी आहे. शरीर, मन आणि बुद्धीसाठी असे खेळ आवश्यक आहेत. खेळ आता कौशल्य, व्यायाम किंवा स्पर्धेपुरता मर्यादित राहिलेला नसून क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचीदेखील संधी आहे.

महाराष्ट्र शासनाने खेळांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत थेट सामावून घेतले जात आहे. खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे श्री.पाटील म्हणाले.

यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘लहेराओ झंडा’ हे सादरीकरण केले. इंडियन स्कुल ऑफ योगच्या विद्यार्थ्यांनी योगासनांचे आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अडथळ्यांचा शर्यतीचे प्रात्यक्षिक सादर केले.

आंतरशालेय स्पर्धेत जिल्ह्यातील १०० शाळा सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.