नागपूर, दि.४ (जिमाका) : वऱ्हाडी, झाडी व नागपुरी आदि विदर्भातील बोलींनी मराठी भाषेच्या सौदर्यांत भर घातली व भाषा विज्ञानात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, न्यूनगंडापोटी या बोलींचा वापर कमी झाला आहे. विदर्भातील कोरकू बोली तर विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, असे निरिक्षण शुक्रवारी साहित्यिकांनी मांडले. तर प्रमाण भाषेचा आग्रह सोडून स्वत:च्या बोलीचा न्यूनगंड न बाळगता प्रभावी वापर व्हावा. बोली अकादमी स्थापन व्हावी, आदिवासी बोलींचे कोश निर्माण व्हावे, असा आश्वासक सूर ‘विदर्भातील बोली-भाषा’ विषयावरिल परिसंवादात निघाला.
96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी आयोजित या परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध साहित्यिक डॉ.सतीश तराळ यांनी भूषविले. डॉ. मनोहर नरांजे, डॉ.श्याम मोहकर, डॉ. पुरुषोत्तम माळोदे आणि प्रकाश एदलाबादकर या भाषा अभ्यासकांनी परिसंवादात सहभाग घेतला.
डॉ. तराळ यांनी परिसंवादातील सहभागी वक्त्यांच्या विचारांचा सार काढून विचार मांडले. विदर्भातील वऱ्हाडी, झाडी या प्रमुख बोली असून नागपुरी, गोंडी, कोरकु, माडिया आदि बोलीही या भागात बोलल्या जातात. प्रमाण भाषेच्या अवाजवी आग्रहामुळे आणि न्यूनगंडामुळे या बोलींसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे. विदर्भातील कोरकू बोली सद्या विलुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. स्वत:च्या बोलीचा न्यूनगंड न बाळगता या बोलींचा प्रभावी वापर व्हावा तसेच, बोलींच्या विकासासाठी व त्यांच्या साहित्यिक समृद्धतेसाठी बोली अकादमी स्थापन व्हावी आणि आदिवासी बोलींचे कोश निर्माण व्हावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
डॉ.तराळ म्हणाले, जॉर्ज गियर्सन यांच्या ‘लिंग्वेस्टीक सर्व्हे ऑफ इंडिया’ या ग्रंथात भारतात १७९ भाषा आणि ५४४ बोली आहेत, असे म्हटले होते. पण २००१ मध्ये झालेल्या भाषिक पाहणीत २२२ भाषा आणि २३४ बोली आहेत असे म्हटले होते. म्हणजे दरम्यानच्या काळात ५७ भाषा आणि ३१० बोली लुप्त झाल्या. संपूर्ण जगातच भाषा लुप्त होत आहेत. मात्र, भाषा लुप्त होण्याचा वेग भारतात जास्त आहे. जागतिकीकरणाचा भाषेवर खूप जास्त परिणाम होत असतो. जागतिकीकरणाची भाषा हीच जगाची भाषा होते. सद्या इंग्रजी ही जागतिकीकरणाची भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या रंगनाथ पाठारे समितीच्या अहवालात मराठीला २३०० वर्षाचा जुना इतिहास असल्याचे आणि या भाषेत ५२ बोली असल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात भाषा अभ्यासक मराठीच्या १५० बोली असल्याचे मानतात याचाच अर्थ मराठीतील १०० बोली लुप्त झाल्याचेही डॉ.तराळ यांनी सांगितले.
डॉ. मनोहर नरांजे यांनी आपल्या संबोधनात वेण्णा आणि वर्धा या दोन नद्यांनी व्यापलेला पूर्व आणि पश्चिम विदर्भातील भूभाग आणि येथील मानव समुहांनी समृद्ध केलेल्या बोलीभाषांच्या भाषिक व्यवहारावर प्रकाश टाकला. विदर्भातील बोली या मराठी भाषेचा निर्झर झरा आहेत. वऱ्हाडी आणि झाडी बोलींनी विदर्भातील भाषिक व्यवहारात दिलेले योगदान महत्वाचे आहे. मराठी भाषेतील आद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ आणि मराठीतील आद्य काव्यसंग्रह ‘विवेक सिंधू’ मध्ये वऱ्हाडी आणि झाडे बोले दिसून येतात असे निरीक्षण त्यांनी मांडले. चंद्रपूरचा राजा रामसिंह याने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला होता, असे हे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. श्याम मोहरकर यांनी विदर्भातील बोरी, नागपुरी या बोलीभाषेतील स्वनिम, रुपिम या तांत्रिक भाषा परिमानांचा अन्य भाषांशी तुलनात्मक संबंध उलगडून दाखवला. या बोलिंमध्ये प्रामुख्याने प्रमाण भाषेतील वर्णांच्या उच्चाराशी आढळणारी भिन्नता त्यांनी ‘च’, ‘ज’ आणि ‘झ’ या वर्णांची उदाहरणे देवून पटवून दिली.
डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांनी विदर्भातील बोली भाषांनी या भागाला सांस्कृतिक पुढारले पण मिळवून दिल्याचे सांगितले. डॉ. ना. गो. कालेलकर लिखित ‘बोली आणि भाषा’ या ग्रंथातील दाखले देत त्यांनी बोली विषयीचे गैरसमज आणि वास्तव याबाबत भाष्य केले. भूप्रदेश व जाती नुसार विदर्भात बोलिंची निर्मिती झाल्याचे सांगत त्यांनी कोष्टी, हळबी, गोंडी, माडिया या बोलिंवर प्रकाश टाकला.
प्रकाश एदलाबादकर यांनी बोली हीच भाषेची आई असल्याचे निरीक्षण मांडले. त्यांनी नागपुरी बोलीचे विविधांगी रूप उलगडून सांगितले. नागपूर मध्ये बोलली जाणारी ही भाषा समाजातील उच्च व निम्न अशा सर्वच वर्गात बोलली जाते. ग. त्र्यं. माडखोलकर, दोडके यांनी नागपुरी भाषेत केलेल्या संशोधन कार्याचाही आढावा त्यांनी घेतला.
०००००