जगाच्या व्यासपीठावर भारतातील नागरी संस्थांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवूया : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

नागपूर दि.5 : विविध सामाजिक समस्या, नागरी समस्या, पर्यावरण ते वन्यजीव संवर्धनासंदर्भात अनेक नागरिक संस्था देशात, विदर्भात मोठ्या समर्पणाने काम करत आहे. जगाच्या व्यासपीठावर भारतातील या नागरी संस्थांच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवण्याची संधी जी-20 आयोजनाच्या माध्यमातून मिळत आहे. या संधीचे सोने करूया, असे आवाहन भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

जी-20 समितीच्या बैठक आयोजन तयारी संबंधात या समितीच्या उपसमितीचे अर्थात सी-20 चे आयोजक तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल रेडिसन ब्ल्यु येथे आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी.,नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, उपायुक्त (सामान्य प्रशासन) प्रदिप कुळकर्णी,  रोजगार हमी योजनेच्या उपायुक्त राजलक्ष्मी शाह, सी-20 वर्कींग ग्रुप मेम्बर अजय धवले, स्थानिक नागरी संस्थाचे प्रतिनिधी शैलेश जोगळेकर, जयंत पाठक , विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, वाहतूक शाखेच्या उपायुक्त चेतना तिडके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शिवराज पडोळे, पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवाई आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.

डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी नागपूर येथे आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकी जी-20 संदर्भात सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.

नागपूर शहरामध्ये 21 व 22 मार्च रोजी जी-20 समूहातील देशातील सिव्हिल सोसायटीचे सदस्य येणार आहेत. जी 20 मध्ये सहभागी असणारे देश व तेथील विविध शिष्टमंडळ वेगवेगळ्या बारा मुद्द्यांवर भारतातील विविध शहरांमध्ये बैठका घेत आहे. एका वर्षाच्या कालावधीमध्ये या बैठकी होत आहेत. जी-20 चे यजमानपद भारताला आल्यानंतर या बैठकीची सुरुवात झाली. नागपूर येथे होणारी जी-20 ही सिव्हिल सोसायटीच्या संदर्भात जागतिक स्तरावरील ध्येय धोरण ठरवणार आहे. त्यामुळे जी-20 बैठकीला  सी-20 असे देखील म्हटले जाते. मुंबई येथे यापूर्वी झालेली बैठक ही व्यापारांची बैठक होती. तर पुणे येथे नुकतीच झालेली बैठक ही अर्बन 20 या संदर्भातील होती. प्रमुख शहरांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील याबैठका होत आहेत. अंतिम बैठक ही 30 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. या अंतिम बैठकीला जी -२० समूहातील प्रत्येक देशाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

नागरी संस्थांच्या संदर्भात नागपूर येथे होणारी बैठक यशस्वीपणे पार पाडण्याचे यावेळी आवाहन सहस्त्रबुद्धे यांनी केले. त्यांनी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा प्रशासनामार्फत आतापर्यंत झालेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. काही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

एक मार्चपासून यासंदर्भातील नियोजित कामे पूर्ण करण्याचे व त्यानंतर पाहुण्यांचे आगमन होईपर्यंत शहर सजविण्याच्या आवाहनही त्यांनी केले. या आयोजनाच्या संदर्भात उद्या जिल्हा प्रशासनामार्फतही आढावा बैठक घेतली जाणार आहे. नागपूरचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे.