एफसी बायर्नबरोबरच्या करारामुळे राज्यातील फुटबॉल खेळाडू करतील उज्ज्वल कामगिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 7 : जर्मनीतील एफ. सी. बायर्न म्युनिक फुटबॉल क्लबबरोबर राज्याने केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील फुटबॉल खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धेच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एफ. सी. बायर्न म्युनिक फुटबॉल क्लबचे व्यवस्थापकीय संचालक मॅक्समिलन हशके, उप सचिव सुनील हांजे उपस्थित होते.

खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये अधिकाधिक पदके जिंकून राज्याचे नाव उंचावण्यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत 5 पट  वाढ करण्यात आली आहे. गोविंदा पथकातील गोविंदांना आता दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक पटकावणाऱ्या खेळाडूंना शासनात थेट नोकरीत नियुक्ती, क्रीडा विषयक प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. खेलो इंडिया स्पर्धेच्या पदक तालिकेत मागील वर्षी राज्याच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदा सुरू असलेल्या स्पर्धेतही प्रथम क्रमांक कायम ठेवतील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. याबद्दल त्यांनी क्रीडा मंत्री श्री. महाजन यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्याने फुटबॉलसाठी जर्मनी आणि कुस्तीसाठी जपानबरोबर सामंजस्य करार केले आहेत. या करारामुळे राज्यातील खेळाडूंना तांत्रिक, खेळातील डावपेच अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळणार आहे.

क्रीडा मंत्री श्री. महाजन म्हणाले, एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धेस उद्यापासून सुरवात होत आहे. राज्यातील एक लाख विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातून २० विद्यार्थी निवडले जाणार आहेत. त्यांना एफ. सी. बायर्न क्लबच्या माध्यमातून जर्मनीत प्रशिक्षण देण्यात येईल. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिच जगातील नामांकित क्लब सून प्रशिक्षक, खेळाडू, कर्मचाऱ्यांसाठी एक मजबूत व्यासपीठ तयार होवून भारतातील- फुटबॉलच्या वाढीस मदत होणार आहे. राज्यात अधिक अत्याधुनिक क्रीडा परिसंस्था निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळ विकसित करण्यासाठी संसाधने आणि तज्ञांचे कौशल्य विकसित करणे, प्रतिभावान प्रशिक्षकांच्या नवीन पिढीचा विकास आणि सक्षमीकरण करणे, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर फुटबॉल खेळ शिकण्यासाठी गुणवत्ता, विविधता आणि प्रवेश योग्यता प्रदान करणे ही या करारामागील उद्दिष्टे आहेत.

फुटबॉल आणि शिक्षणाद्वारे तरुणांचे जीवन सुधारणे, विविध कोचिंग आणि संशोधन मॉड्यूल्सद्वारे फुटबॉलचे ज्ञान आणि समज वाढविण्यासाठी हा करार करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

000

राजू धोत्रे/विसंअ/