चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना मिळणार हक्काची घरे

0
14

मुंबई, दि. ७ : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना “सर्वांसाठी घरे” योजनेत घरे, तसेच वैमानिक प्रशिक्षण यासह महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या सूचनांवर आज आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांनी हे निर्णय घेतले आहेत.

आज दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूर महसूलीविभागाची जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम प्रारुप आराखडा २०२३-२४ संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्या संदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या होत्या. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी या सर्व सूचना तात्काळ स्वीकारल्या.

आजच्या निर्णयांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कोलम समाजातील आदिवासी बांधवांना “सर्वांसाठी घरे” या योजनेतंर्गत घरकुले उपलब्ध करुन देण्यात येतील. या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्नही करण्याची आवश्यकताही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विशद केली होती. त्यावरही योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना चंद्रपूर फ्लाईंग क्लब येथे वैमानिक प्रशिक्षण देण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रामधून प्लग अँड प्ले युनिटससाठी आदिवासी विभाग वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील स्वत:ची घरे नसणाऱ्या आदिवासी बांधवाना ड गटाचा विचार न करता घरे बांधून देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या या बैठकीत घेण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या चारही सूचना महत्त्वपूर्ण आणि योग्य आहेत त्यामुळे त्या सर्व स्वीकारण्यात येत आहेत असे बैठकीचे अध्यक्ष व आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी सांगितले. या चार महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here