शासकीय सेवेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक: 9 फेब्रुवारी 2023 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाच्या शासकीय विभागांतील 75 हजार पदांची भरती करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने अनुकंपा भरती अंतर्गत नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांनी शासकीय सेवेत काम करतांना नियमांचे पालन करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अनुकंपा भरती 2023 नियुक्ती आदेश वाटपाच्या आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उप वनसंरक्षक पंकज गर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, जिल्ह्यातील विविध विभागांच्या अनुकंपा प्रतिक्षासूचीतील पात्र उमेदवारांना देण्यात आलेले नियुक्ती आदेश म्हणजे त्यांना जनसेवा करण्याची मिळालेली संधी आहे. शासकीय सेवेत काम करतांना नियम, कायद्यांचे पालन करून सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून राज्याची प्रगती झाली पाहिजे या दृष्टिने काम करणे अपेक्षित आहे, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नोकर भरतीची प्रक्रीया प्रगतीपथावर आहे. याच धर्तीवर जिल्ह्याने राबविलेला अनुकंपा भरतीचा पॅटर्न राज्यात उत्स्फूर्तपणे स्वीकारला जाईल. तसेच अनुकंपा भरती प्रक्रीया राबवत असतांना अनुकंपा तत्वावरील पात्र लाभार्थ्यांना नोकरी देण्यासाठी असणारे नियम लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व विभागांनी मोहिमस्तरावर केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यामुळे अनुकंपा तत्वामधील पात्र उमेदवारांना न्याय मिळाला आहे. याचप्रमाणे येत्या काळात इतर शासकीय यंत्रणांनी देखील त्यांच्या विभागातील पात्र असणाऱ्या अनुकंपा उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.

पात्र उमेदवारांना अनुकंपाच्या माध्यमातून नोकरी मिळाली आहे, त्यांनी आपल्या कुटुंबियांचा आदरपूर्वक सांभाळ करण्याची जबाबदारी देखील पार पाडावी. व्यसनांपासून स्वत:सोबतच इतरांनाही दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून सर्व नियुक्ती आदेश मिळालेल्या उमेदवारांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते 50 उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती आदेशांचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील 37 विभागातील 275 पात्र अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वाटप यावेळी केले. जिल्हा परिषदेतील सर्वाधिक म्हणजे 127 अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी व अनुकंपा भरती प्रक्रीयेत समन्वय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विजय कच्छवे यांनी पार पाडलेली जबाबदारी उल्लेखनीय असल्याने पालकमंत्री श्री. भुसे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. व जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी मनोगत व्यक्त करत सर्व नवनियुक्त उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

या विभागांनी दिले अनुकंपा नियुक्ती आदेश.

.क्र. कार्यालय आदेश वाटप संख्या
1 जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक 7
2 जिल्हा परिषद, नाशिक 127
3 उप संचालक (आरोग्य सेवा), नाशिक 17
4 महानगरपालिका, नाशिक 16
5 महानगरपालिका, मालेगाव 9
6 अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक 11
7 सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, नाशिक 9

 

 

8 मुख्य वनसंरक्षक, (प्रादेशिक), नाशिक 8
9 विभागीय सह निबंधक सहकारी संस्था लेखा परिक्षण, नाशिक 7
10 अपर आयुक्त आदिवासी विकास, नाशिक 6
11 विभागीय कृषी सह संचालक,नाशिक 6
12 पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामिण, नाशिक 5
13 विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था,नाशिक 4
14 प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक 4
15 प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण 4
16 अधिक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, नाशिक 3
17 कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक 3
18 सहसंचालक, तंत्र शिक्षण, नाशिक 3
19 मा.पोलीस आयुक्त, नाशिक शहर,नाशिक 3
20 अधिक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे 3
21 प्रादेशिक सह आयुक्त, पशुसंवर्धन, नाशिक 2
22 अपर राज्यकर आयुक्त, वस्तु व सेवाकर नाशिक 2
23 अधिक्षक अभियंता, धरण सुरक्षितता, नाशिक 2
24 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नाशिक 1
25 जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), नाशिक 1
26 उपसंचालक (भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा) नाशिक 1
27 जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक 1
28 उपसंचालक (माहिती ), नाशिक 1
29 अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक 1
30 अधिक्षक अभियंता, (प्रशासन) मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, नाशिक 1
31 अधिक्षक अभियंता, आधार सामग्री पथ:करण मंडळ, नाशिक 1
32 सहसंचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षण, नाशिक 1
33 अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक 1
34 उप संचालक, क्रिडा व युवक सेवा, नाशिक 1
35 सहजिल्हा निबंधक, वर्ग 1 नाशिक 1
36 जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक 1
37 अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर 1
एकुण 275

 

000