नाशिक, दिनांक 10 – आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडाविषयक गुण व कौशल्यास चालना मिळण्यासाठी तसेच आदिवासी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात विविध संधी उपलब्ध करून देण्याकरिता आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
आज महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी आमदार किशोर दराडे, नितीन पवार, हिरामण खोसकर, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त तुषार माळी, नाशिक व कळवण प्रकल्प अधिकारी जतीन रहेमान, विशाल नरवाडे यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थींच्या रुपाने चांगले खेळाडू तयार होणार आहेत. विविध स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंना स्पर्धा, क्रीडा प्रकार व संघानुसार वेगवेगळे ड्रेसकोड असणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांच्यातील सांघिक भावना वृद्धींगत होईल. त्याचप्रमाणे खेळाडूंच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी उत्तम प्रशिक्षकांमार्फत आवश्यक असलेले प्रशिक्षण व साहित्यही आदिवासी विकास विभागाच्यावतीने उपलब्ध करून देत असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले.
आगामी वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये देखील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी होऊन आपले खेळातील नैपुण्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिस्त व योग्य सकस आहाराचे ज्ञान यासोबतच नियमित व्यायाम व खेळाचा सराव करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आदिवासी आश्रमशाळातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी खेळाच्या सरावासह त्यांना प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे, असे मत यावेळी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केले.
यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले की, केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणानुसार आगामी काळात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक बोली भाषेतून शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अभ्यासात चांगली प्रगती असलेल्या विद्यार्थ्यांची आश्रमशाळांमधून निवड करून त्यांच्यासाठी सुट्टीच्या दिवशी व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून गणित, विज्ञान व इंग्रजी याविषयांतील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अपर आयुक्त व प्रकल्प कार्यालयांच्या आश्रमशाळेतील मुलांसोबतच मुलींना देखील उत्तम प्रशिक्षक देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शालेय सुट्टीच्या काळात शिबीरांच्या माध्यमातून देशपातळीवरील प्रशिक्षकांमार्फत विविध खेळाचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येईल. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल, अशी अपेक्षा मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केली.
मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी अनेक वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्या योजनांची माहिती देण्यासाठी 1800 267 0007 हा टोल फ्री क्रमांक आज सुरु करण्यात आला आहे. या टोल फ्री क्रमांकावर शैक्षणिक योजनांसोबतच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, जमातीचा दाखला, बँकेत खाते उघडणे, मनरेगा नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड आदी कागदपत्रे मिळणेबाबतची माहिती व मार्गदर्शन कार्यालयीन वेळेत करण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. गावित यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाच्या सुरूवातीला क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले तर अपर आयुक्त तुषार माळी यांनी आभार मानले.