टँकरधारकांनी मुंबईतील पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

0
9

मुंबई, दि. 13 : मुंबईत ठिकठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचा पाणीपुरवठा थांबविल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. या टँकरधारकांनी लोकांना पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी टँकर असोसिएशन यांना केले. यासंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीदरम्यान त्यांनी टँकर असोसिएशनच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयात बैठक घेऊन मुंबईतील पाणी टँकरधारकांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करु, पण तत्पूर्वी टँकरधारकांनी लोकांना पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. लोढा यांनी केले.

बैठकीस मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. लोढा यांनी यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशीही यासंदर्भात दूरध्वनीवरुन चर्चा करुन लोकांना तत्काळ पाणीपुरवठा सुरु होण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

शासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईतील टँकर्सनी अचानक लोकांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणी लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. अशा पद्धतीने पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची गैरसोय करणे योग्य नाही. या टँकरधारकांशी त्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यास शासन कधीही तयार आहे. त्यामुळे टँकरधारकांनी लोकांना तत्काळ पाणीपुरवठा सुरु करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. लोढा यांनी असोसिएशनच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरुन झालेल्या चर्चेत केले. टँकरधारकांच्या प्रश्नासंदर्भात उद्या सकाळी पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्याचे या चर्चेत निश्चित करण्यात आले.

००००

इरशाद बागवान/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here