ठाणे दि. 15 (जिमाका) : राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात योजनांच्या लाभाचे वितरण कार्यक्रम झाले तर लोकांना अपेक्षित असलेले सरकार आपण देऊ शकतो. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. हा नवीन कल्याण पॅटर्न आहे. राज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे, तरच हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रमांतर्गत शासकीय योजनांच्या लाभाचा वितरण सोहळा व भव्य लाभार्थी सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार नरेंद्र पवार आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, शिधापत्रिका वाटप, संजय गांधी निराधार योजना, मातृत्व वंदन योजना, श्रावणबाळ योजना, सखी आरोग्य किट, आदी योजनेच्या लाभाचे सुमारे दहा हजारहून अधिक लाभार्थींना वितरण करण्यात येणार आहे. यातील काही प्रातिनिधिक लाभार्थींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आग्र्याच्या लाल किल्यातील दिवाण ए आम मध्ये 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यास मंजुरी मिळाली आहे. हा आनंदाचा क्षण आहे. या कार्यक्रमास मंजुरी दिल्याबद्दल प्रधानमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. शपथविधी नंतर घेतलेले प्रत्येक निर्णय हे सर्वसामान्यांना मदत करणारे, त्यांना न्याय देणारे आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या योजना कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे व सरकार घरापर्यंत पोचण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यासाठी मोठी तरतूद आहे. राज्याच्या हितासाठी निर्णय घेत आहोत. ठाण्यात रस्ते विकसित केले. त्याप्रमाणे कल्याणमध्ये चांगले रस्ते होण्यासाठी प्रकल्पबधितांना युएलसीची घरे मिळण्यासाठी प्रयत्न करू. राज्यातील तरूण स्वतःच्या पायावर उभा राहून दुसऱ्याच्या हाताला काम देणारे उद्योजक होण्यासाठी इनोव्हेशन हबला राज्य शासन सहकार्य करणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवू या. योजना फक्त कागदावरच न राहता लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ कल्याण पूर्व मधील लोकांना देण्यात येत आहे. तळागाळातील एकही लाभार्थी वंचीत राहू नये, लोकांपर्यंत त्या पोचल्या पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करत आहोत. महिलांसाठी राज्य सरकार चांगले काम करत आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित, आपला दवाखाना या योजना राबविण्यात येत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री श्री पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमुळे जनतेला खूप मोठा फायदा मिळत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खूप चांगल्या योजना मतदार संघामध्ये राबविल्या आहेत. या योजनांचा लोकांना खूप फायदा होणार आहे.
यावेळी लाभार्थींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते लाभाचे व नवीन शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
00000