पालघर जिल्ह्यात ५ आयटीआयमध्ये स्कील सेंटर सुरु – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १६ : पालघर जिल्ह्यातील पालघर, जव्हार, मोखाडा, वाणगाव व तलासरी येथील आयटीआयमध्ये विविध कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या स्कील सेंटरचा आज राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आदिवासी उमेदवारांकरीता जव्हार येथे प्रस्तावित असलेले नवीन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरु करण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी जाहीर केले.

पालघर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (आयटीआय) मधील स्कील सेंटरमध्ये डोमेस्ट‍िक आयटी हेल्पडेस्क अटेन्डन्स हा कमी कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. त्याचबरोबर जव्हार शासकीय आयटीआयमध्ये लाइट मोटर व्हेईकल ड्रायव्हर, मोखाडा शासकीय आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन टेक्निकल, वाणगाव शासकीय आयटीआयमध्ये लाइट मोटर व्हेईकल ड्रायव्हर, तलासरी शासकीय आयटीआयमध्ये डोमेस्ट‍िक आयटी हेल्पडेस्क अटेन्डन्स हे कमी कालावधीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तुकडीत प्रत्येकी ३० उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. आज पालघर येथील स्कील सेंटर तसेच अभ्यासक्रमाचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते, तर अन्य ठिकाणच्या सेंटरचा ऑनलाईन पद्धतीने प्रारंभ करण्यात आला.

जिल्ह्यातील आदिवासी उमेदवारांकरीता जव्हार येथे नवीन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी आवश्यक सर्व बाबींची उपलब्धता करुन देवून लवकरच हे केंद्र सुरु करण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी जाहीर केले. ते म्हणाले की, तरुणांना दर्जेदार कौशल्य आणि त्यानंतर शाश्वत रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकास विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. आदिवासी भागातील उमेदवारांसाठीही त्या – त्या भागाच्या गरजेनुसार विविध कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येतील. जव्हार येथे प्रस्तावित प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्र हे त्यादृष्टीने महत्वपूर्ण केंद्र ठरेल. आज जिल्ह्यात ५ ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या स्कील सेंटरचा जिल्ह्यातील युवक-युवतींना लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रोजगार मेळाव्यात २ हजार ९९६ उमेदवारांचा सहभाग

पालघर येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचाही मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते आज सकाळी प्रारंभ करण्यात आला. या मेळाव्यात विविध ५२ कंपन्या, उद्योग यांनी सहभागी होत त्यांच्याकडील ४ हजार १९८ रिक्त जागा भरतीकरिता उपलब्ध केल्या होत्या. मेळाव्यात २ हजार ९९६ उमेदवारांनी यामध्ये सहभाग घेतला. त्यातील ८०६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर विविध कंपन्यांनी ४०० उमेदवारांची अंतिम निवड केली.

यावेळी खासदार राजेंद्र गावित, सहसंचालक किशोर खटावकर, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी दयानंद सिडाम, कौशल्य विकासचे अधिकारी शालिक पवार, संध्या साळुंखे आदी उपस्थित होते.

०००

इरशाद बागवान/विसंअ/