नवी दिल्ली, दि. 16 : राजधानी दिल्लीत आजपासून ‘आदि महोत्सव’ सुरू झाला आहे. यात राज्यातील आदिवासी संस्थांची तसेच कारागिरांनी दालने उभारली आहेत.
मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये या महोत्सवाची सुरूवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा उपस्थित होते. हा मेळावा 27 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.
‘आदि महोत्सवा’त 200 पेक्षा अधिक दालने आहेत. यामध्ये आदिवासी समाजातील समृद्धता आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले जाईल. हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष (भरडधान्य) म्हणून साजरे केले जात आहे. यातंर्गत आदिवासी समाजात रोजच्या आहारात वापरण्यात येणाऱ्या भरड धान्याची दालने ही आहेत. यासोबत हस्तकला, हातमाग, मातीची भांडी, दागदागिने, अलंकार, सजावटीच्या वस्तू आदी महोत्सवाचे आकर्षण आहे.
राज्याच्या वतीने या ठिकाणी दालने उभारली आहेत. यांतर्गत तीन वारली चित्रकार कारागीर, जिल्हा गडचिरोली, तालुका धानोरा येथील दीपज्योती लोकसंचालित सधन वनधन विकास केंद्राच्या वतीने दोन दालने उभारली आहेत. यात आदिवासी समाज जीवनातील खाद्य पदार्थांची दालने आहेत. एक आदिवासी शेतकरी उत्पादित कपंनीच्या वस्तुंचे दालन आहे. आणखी एक सेंद्रिय वस्तूंच्या उत्पादनाचे स्टॉल राज्याच्या वतीने उभारले आहेत.
सकाळी 11 ते रात्री आठपर्यंत ‘आदि महोत्सव’ सुरू राहणार आहे. राज्याच्या दालनाला भेट देण्याचे आवाहन ट्रायफेडतर्फे यांनी केलेले आहे.
000
वि.वृ.क्र. 33/ दि.16.02.2023