पाणीपुरवठा करणाऱ्या विविध योजनांना गती द्यावी – मंत्री गुलाबराव पाटील

औरंगाबाद दि 20 (जिमाका) :- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी गतिने  करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणांना दिले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध कार्यालयाच्या एकत्रित ‘जलभवन’ या नूतन इमारतीचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

सहकार व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मुख्य अभियंता आर.एस. लोलापोड, कार्यकारी अभियंता विजय कोळी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता एस.एस.गायकवाड, लातुर मंडळाचे प्रवीण पाटील, कार्यकारी अभियंता महाराष्ट जीवन प्राधिकरणाचे दिपक गुंडू, प्रकाश गिरी बीड, अ.च.नाडगौडा, उस्मानाबाद, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) तुषार टेकवडे व विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी  या जलभवन इमारत उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

इमारतीचे ठळक वैशिष्टये म्हणजे रेल्वे स्टेशन पासुन 1 किमी अंतरावर तर  मध्यवर्ती बसस्थानक पासून 3 किमी अंतरावर आहे. इमारतीमध्ये मुख्य अभियंता प्रादेशिक  विभाग,अधीक्षक अभियंता, मंडळ औरंगाबाद, कार्यकारी अभियंता कार्यालय विभाग उपविभाग चे 2 कार्यालये असे एकूण 6 कार्यालये एकाच इमारतीत स्थित आहेत. एकूण बांधकाम क्षेत्रफळ 2753 चौसेमी, असून तळ मजला पहिला व दुसरा मजला तसेच  वातानुकुलित सभागृह, सुसज्ज अग्निशमन यंत्रणा आहे. आपतकालीन वेळी बाहेर पडण्याकरीता स्वतंत्र मार्ग व पायऱ्या, प्रत्येक कक्षामध्ये धूर शोधक यंत्रणा, वीज पुरवठा खंडित झाल्यास आपातकालीन वीज जनरेटरची सोय, अभ्यागतासाठी बैठकीची सुविधा असुन इमारतीच्या  बाहेरील बाजूस पार्किंग करीता आच्छादानाची सोय उपलब्ध आहे.