पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाने महान नृत्य गुरु हरपल्या – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 22 : “पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनामुळे आपले जीवन शास्त्रीय नृत्याला समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ नृत्य गुरुंना आपण मुकलो आहोत”, अशा शब्दांत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोकसंदेशात ते म्हणाले की, मोहिनीअट्टम आणि कथकली या नृत्य प्रकारात पारंगत असलेल्या डॉ. कनक रेळे या नृत्य गुरू म्हणूनच अधिक परिचित होत्या. आपले संपूर्ण जीवन भारतीय शास्त्रीय नृत्याच्या प्रचार, प्रसार, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी त्यांनी वेचले. एका तपस्विनीचे आयुष्य त्या जगल्या. भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार सामान्य जनतेतही लोकप्रिय करण्यात त्यांच्या ‘नालंदा नृत्य आणि संशोधन केंद्र’ आणि ‘नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचा मोठा वाटा आहे. या संस्थांमधून त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले. भारतीय शास्त्रीय नृत्य क्षेत्रात त्यांनी केलेले मूलभूत संशोधन जगभर नावाजले गेले आहे. डॉ.कनक रेळे यांच्या योगदानासाठी शास्त्रीय नृत्य क्षेत्र त्यांचे कायमच ऋणी राहील ”

००००

वर्षा आंधळे/विसंअ/