चंद्रपूर, दि. 24 : कृषीपासून ते उद्योगांपर्यंत सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर भारत करण्याचा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे. कृषी क्षेत्र सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असून ख-या अर्थाने शेतकरी हाच खरा आत्मनिर्भर भारताचा कणा आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चांदा क्लब येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी महोत्सवाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक नंदकुमार घोडमारे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हिरुळकर उपस्थित होते.
कृषी क्षेत्राच्या भरभराटीसाठी जिल्ह्यात ‘मिशन जयकिसान’ राबविण्याचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे सिंचनाच्या व्यवस्था करण्यात येईल. राज्यातील सर्व माजी मालगुजारी तलावाच्या नुतणीकरणासाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती आपण उपमुख्यमंत्र्यांना केली आहे. येत्या अर्थसंकल्पात ही घोषणा होणार असून पहिल्या टप्प्यात 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणी हे अमृत आहे. आपली गावे कसे वॉटर न्यूट्रल करता येतील, त्याबाबत नियोजन करावे. यासाठी खनीज विकास निधी, नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊ.
पाच दिवस चालणा-या या कृषी महोत्सवात एकूण 211 स्टॉल लागले असून यातून कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक माहिती मिळेल. जिल्हा प्रत्येक बाबतीत अग्रेसर राहावा, यासाठी आपण कटिबध्द आहोत. अर्थमंत्री असतांना आपण सहकारी शेतीची संकल्पना मांडली. राज्यात 1 कोटी 37 लक्ष शेतकरी भोगवटादार असून 1 कोटी 7 लक्ष शेतकरी अल्पभुधारक आहेत. ‘चांदा ते बांदा’ योजनेत कृषी आर्मी करण्याचा आपण संकल्प केला होता. दुस-याचे पोट भरणारा शेतकरी उपाशी राहणे योग्य नाही. त्यासाठी सामुहिक शेती हा चांगला पर्याय आहे. शेतकरी प्रक्रिया उद्योगांचे जाळे विणण्यासाठी शेतकरी समोर येत आहे.
पुढे पालकमंत्री म्हणाले, रक्त आणि पोट भरणारे धान्य कृत्रिमरित्या निर्माण करता येत नाही. अलिकडच्या काळात शेती करण्याकडे कल कमी झाला आहे. शेती हा मजबुरीचा नव्हे तर मजबुतीचा व्यवसाय होणे आवश्यक आहे. शेत तिथे मत्स्यतळे अशी योजना राबविण्यात येणार आहे. किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून अल्पदरात शेतक-यांना कर्ज मिळू शकते. जिल्ह्यात भाजीपाला क्लस्टर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. एवढेच नाही तर कृषी स्टार्ट अपमध्ये पहिला शेतकरी आपल्या जिल्ह्यातून व्हायला पाहिजे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे. शेतक-यांनो केवळ कृषी प्रदर्शनी बघू नका तर नवीन तंत्रज्ञान घेऊन शेती जगविण्याचा विचार करा.
पुढील वर्षी कृषी महोत्सव हा डिसेंबर महिन्यात घेण्यात यावा. या कृषी महोत्सवाकरीता शेतकरी, नागरीक यांच्या सुचना मागण्यासाठी आजपासूनच येथे एक बॉक्स ठेवा. उत्कृष्ट सुचना देण्या-यांना आपल्या स्वत:कडून 11 हजार, 5 हजार व 3 हजार असे बक्षीस देण्यात येईल. तसेच पुढील महोत्सवात एक दिवस कृषी साहित्य अधिवेशन, एक दिवस सेंद्रीय शेतीवर मार्गदर्शन असे सत्र आयोजित करावे. अत्याधुनिक नर्सरीच्या बाबतीत शेतक-यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी नाविन्यपूर्ण किंवा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, जिल्ह्यात ज्वारीचा पेरा वाढला आहे. त्यामुळे पशुधनासाठी चांगले कुटार उपलब्ध होईल. कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याचा शेतक-यांनी अवलंब करावा. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शेतक-यांपर्यंत शासनाच्या विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञान पोहचविणे, हा यामागचा उद्देश आहे. शेतक-यांनी खाजगी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी. जिल्ह्यात पाण्याची कमतरता नाही. त्यामुळे दुबार – तिबार पिके घेतली तर शेतक-यांचे उत्पन्न वाढेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध स्टॉलला भेटी देऊन माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले. संचालन एकता बंडावार यांनी तर आभार उपसंचालक रविंद्र मनोहरे यांनी मानले. कार्यक्रमाला शेतकरी प्रक्रिया उद्योगाचे प्रतिनिधी, विविध स्टॉलचे प्रतिनिधी, शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
पशु प्रदर्शनीला भेट : जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चांदा क्लब समोरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या ग्राऊंडवर पशु प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली व पशुपालकांशी संवाद साधला.