औद्योगिक वसाहतीला आवश्यक सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, दि. 4 (जि. मा. का.) : सोलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये वस्त्रोद्योग उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने महानगरपालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तात्काळ संयुक्त बैठक घेऊन अग्निशमन व्यवस्थेसह अंतर्गत रस्ते दुरुस्ती व अन्य आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या.

सोलापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, सर्वश्री आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष राजू राठी, सचिव धवल शहा, खजिनदार निलेश पटेल, संचालक संजय कंदले, अक्कलकोट रोड एम आय डी सी अध्यक्ष तिलोकचंद कांसवा, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ सहसचिव मल्लिकार्जून कमटम, अंबादास बिंगी, नारायण आडकी, चिंचोली इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष वासुदेव बंग तसेच अन्य उद्योजक उपस्थित होते.

     यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्ते करताना मिळकत कर महापालिकेकडे गेला तरी भूखंड हस्तांतरण आणि इतर महसुली कामांतून सुविधा देण्याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात. अग्निशमन व्यवस्था सुस्थितीत ठेवावी. त्यासाठी लागणारे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता ठेवावी. आग लागली तर ती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. उद्योजकांनीही उद्योगस्थळी आगप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

    पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शहरातील व्यापार थांबू नये आणि अपघातही होऊ नये, यासाठी व्यापारी आणि पोलीस आयुक्तांनी संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढावा. निर्यातक्षम उत्पादनासाठी ड्रायपोर्ट उभारणी कशी असावी, याबाबत जालन्यातील प्रकल्पाची पाहणी करावी, अशा सूचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

औद्योगिक वसाहतीमध्ये अंतर्गत रस्ते करावेत, अग्निशमन व्यवस्था सुस्थितीत असावी, शहरात अत्यावश्यक सेवेतील जड वाहतुकीला परवानगी द्यावी, सोलापूरमध्ये कामगार कल्याण मंडळ कार्यालय सुरू करावे, अशा मागण्या उद्योग जगाकडून यावेळी करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा सत्कार

दरम्यान लोकसत्ता जिल्हा निर्देशांक 2022 पुरस्काराने काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना गौरविण्यात आले. यानिमित्त उद्योजकांच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.