लोणार व शेगाव विकास आराखड्याबाबत विभागीय आयुक्तांकडून आढावा

अमरावती, दि. १० – लोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे पूर्णत्वास जाणे आवश्यक असून, त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.

शेगाव व लोणार विकास आराखडा, तसेच विविध विषयांचा आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकांद्वारे आज घेतला. उपायुक्त गजेंद्र बावणे, आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी उपस्थित होते.

शेगाव विकास आराखड्यात ४२९ कोटी ५६ लाख रू. निधीतून विविध कामांना चालना मिळाली. त्याचप्रमाणे,  लोणार विकास आराखड्यात ३६९ कोटी ७८ लाख रू. निधीतून कामांना चालना देण्यात आली आहे, अशी माहिती श्री. चौधरी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. आराखड्यातील अपूर्णावस्थेतील कामे तत्काळ पूर्ण करावी. दोन्ही स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी दिले.

विभागातील सर्व जिल्हाधिका-यांची बैठकही आयुक्तांनी घेतली व महसूली वसुलीचे उद्दिष्ट 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विविध जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला.  आवास योजनांतील घरकुलांची कामे पूर्ण आवश्यक आहे. त्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

०००