मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष सर्वांना सोबत
घेऊन साजरे करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १६ – ‘मराठवाडा अमुचा मान, मराठवाडा अमुचा सन्मान, मराठवाडा अमुचा अभिमान, उत्साहाने साजरा करू मराठवाडा मुक्ती संग्राम’ असे सांगून हा सर्वांचा कार्यक्रम आहे, तो सर्वांना सोबत घेऊन साजरा करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला मंत्री श्री. मुनगंटीवार उत्तर देत होते.
मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, मराठवाड्याचा इतिहास जपण्यासाठी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी तज्ज्ञांची समिती तयार केली आहे. मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून या उपक्रमांसाठी ७५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जो निधी लागेल तो उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगून मराठवाड्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. शासनाच्या सर्व विभागांमार्फत मराठवाड्याच्या विकासाच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यास सांगण्यात आले असून यात लोकप्रतिनिधींनीही आपल्या सूचना कराव्यात, असे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, विक्रम काळे, गोपीचंद पडळकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
000
बी.सी.झंवर/विसंअ/