मनीषाची इच्छा…गवसला तिथे मार्ग!

परिस्थितीतून मार्ग काढण्याची जिद्द, नवनवीन कल्पनांचा अंगिकार करण्याची वृत्ती आणि व्यवसायात उतरुन तो यशस्वी करण्याचे धाडस व कला या बाबी एकत्र आल्या म्हणजे उद्योजकतेचा पाया घातला जातो. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर शिवरी (ता. पुरंदर) येथील मनीषा संतोष कामथे यांनी मसाला आणि सहउत्पादने निर्मितीच्या क्षेत्रात यश मिळवून हे सिद्ध केलंय…!

मनीषा यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. घरच्या शेती व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण यासाठी त्यांची खूप ओढाताण होत असे. तीन मुले असल्याने त्यांच्या शिक्षणासाठीच्या खर्चाची जुळवाजुळव करणे कठीण होते. काहीतरी व्यवसाय करुन कुटुंबाला हातभार लावण्याचा त्यांचा विचार पाहून मावसबहिणीने डंका घेऊन मसाले कुटून देण्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार २०१९ मध्ये एक लहान मसाला यंत्र घेऊन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ग्राहकांचे मसाले कुटून देण्याचे काम केले.

ग्राहकांची गरज लक्षात घेऊन मनिषा यांनी पती संतोष कामथे यांच्या मदतीने बाजारातून चांगल्या प्रकारची मसाल्याची साधनसामुग्री आणून विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली. मग व्यवसायाला आणखी जोड म्हणून शेवई यंत्र खरेदी करुन शेवई तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. मसाले, शेवई तयार करुन देत असतानाच स्वत:ही हे पदार्थ तयार करुन विक्रीदेखील सुरू केली. एक वेगळी आणि अस्सल चव राखल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला.

शिवरीतील ग्रामविकास स्वयंसहाय्यता समूहात मनीषाच्या सासू सदस्य होत्या. मनीषाची धडपड पाहून समुहाने त्यांना सासूच्या जागी सदस्य करून घेतले. २०२१ मध्ये शिवरीमध्ये बँक ऑफ बडोदाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत (आरसेटी) बचत गटांसाठी आयोजित १० दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ४० प्रकारचे मसाले, लोणचे, शेवया, पापड आदी पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून आपल्या व्यवसायात वाढ करण्याची प्रेरणा मनीषा यांना मिळाली.

आपल्या व्यवसायासाठी त्यांनी एचडीएफसी बँकेकडून ३ लाख रुपये कर्ज घेतले. पंचायत समितीकडून बीजभांडवल प्रकरण मंजूर झाले व ४० हजार रुपये मिळाले. इतर बँकाकडूनही कर्ज घेतले. त्यातून नवीन यंत्रे घेऊन व्यवसायाचा विस्तार केला. या माध्यमातून चार प्रकारचे लोणचे, शेवई, सांडगे, पापड, कुरडई, पापडी, बटाटा वेफर्स, खारवडे आदी पदार्थही बनवण्यास सुरुवात केली.

ऑगस्ट २०२२ मध्ये बारामती येथील शारदा महिला संघाअंतर्गत बारामती अॅग्री या गटाशी त्यांच्या व्यवसायाची जोडणी करण्यात आली. त्या माध्यमातून मनिषा यांची ‘फार्म दीदी’ या संस्थेची ओळख झाली. मनिषा यांनी बनवलेले लोणचे, मसाले, पापड त्यांच्या पसंतीस उतरले. त्यानुसार संस्थेसाठी पदार्थ बनवून देण्याची संधी उपलब्ध करुन दिली. संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणानुसार त्यांच्या मागणीप्रमाणे लसूण लोणचे, लसूण चटणी, लिंबू मिरची लोणचे, चिली आदी पदार्थ बनविण्यास सुरूवात केली. ५० ते ६० किलोच्या ऑर्डरपासून सुरूवात होऊन आता दर पंधरा दिवसाला ८०० किलोपर्यंत पदार्थांची ऑडर मिळू लागली आहे. बचत गटाच्या सदस्य वैशाली हणुमंत वाबळे यांच्याबरोबर भागीदारीतून त्या या संस्थेला पदार्थ पुरवतात.

याच बरोबर मनीषा कामथे यांनी ‘महालक्ष्मी मसाले’ या नावाने मसाल्याचा स्वत:चा ब्रँड केला असून हळूहळू त्याला मागणी वाढत आहे. त्यांच्याकडे मसाले तयार करुन घेण्यासाठी तालुक्यात दूरवरून ग्राहक येतात. त्यांच्या मसाले तसेच इतर पदार्थांचे मार्केटिंग कोकणापर्यंत पोहोचले आहे. दीराची गाडी भाजीपाला विक्रीसाठी कोकणात जात असते. तेथेही महालक्ष्मी मसाल्यांचा प्रचार प्रसार करण्यात आला असून तेथूनही मागणी येत आहे.

मसाले तयार करण्यासाठी मिरची पुणे येथील बाजारातून स्वत: निवड करुन विकत घेतली जाते. कच्ची मसाल्याची सामग्री लवंग, मिरी, दालचिनी आदी थेट केरळमधून खरेदी करण्यात येते. त्यामुळे मसाल्यांना अस्सल सुगंध आणि चव येते असे त्यांनी सांगितले.

हे सर्व होत असताना त्यांना त्यांच्या ग्रामविकास स्वयंसहाय्यता समूहाचे मोठे पाठबळ लाभले आहे. गटाला बँकेडून मिळालेल्या कर्जाचा मोठा भाग मनीषा यांना व्यवसायवृद्धीसाठी कर्जरुपात दिला जातो. ज्योती आबनावे या गटाच्या अध्यक्षा तर पूर्वी गावच्या सरपंच असलेल्या अश्विनी क्षीरसागर सचिव आहेत.

२०-२५ वर्षापूर्वीची स्थापना असलेल्या गटाचे बचत जमा करणे, छोट्या व्यवसायासाठी सदस्यांना अंतर्गत कर्ज वाटप व असे काम चालू होते. २०१९ ला हा गट – उमेद अभियानाशी जोडल्यानंतर सर्व सदस्य महिलांच्या व्यवसायाला गती आली. गावामध्ये २०च्यावर महिला स्वयंसहाय्यता समूह आहेत. ग्रामसंघाची दर १५ दिवसाला बैठक होत असते. गावातील बचत गटांच्या सर्व महिला यावेळी उपस्थित असतात. बैठकीत नवनवीन कल्पना पुढे येतात. त्यातून नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते.

हा गट कृषी विभागाच्या ‘आत्मा’शी जोडला आहे. त्यामुळे बारामती येथे झालेल्या ‘कृषिक-२०२३’ प्रदर्शनात आत्माच्या माध्यमातून गटाला स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आला. याशिवाय पुणे विभागीय सरस विक्री प्रदर्शन ‘दख्खन जत्रा’ मध्येही स्टॉल लावण्यासाठी ‘उमेद’ अभियानाने स्टॉल उपलब्ध करुन दिला. यावेळी मनिषा कामथे यांच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील ग्राहकांनीही ऑर्डर दिल्या. बचत गटाला आता स्वस्त धान्य दुकान परवाना मंजूर झाला असून प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.

मनीषा कामथे यांनी ‘फार्म दीदी’ संस्थेला पुरवलेल्या पदार्थांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) संस्थेकडून विशेष पुरस्कार मिळाला आहे. युनडीपीच्या प्रतिनिधींनी मनीषा यांच्या युनिटची पाहणी करीत त्यांची संघर्षगाथा जाणून घेतली. ही संघर्षगाथा आता यशोगाथा म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त जगातील दोनशे देशामध्ये प्रसारित झाली. खऱ्या अर्थाने त्यांच्या संघर्षाला झळाळी मिळाली, असे म्हणता येईल.

मनीषा कामथे, शिवरी:- सध्या आमच्याकडे दोन- तीन महिला नियमित काम करत असून बचत गटातील अन्य सदस्य महिलांनाही आपल्या पदार्थ निर्मितीमध्ये सहभागी करुन घेत रोजगार निर्माण केला आहे. पदार्थांना मागणी मोठी असून आता व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या यंत्रसामुग्री घ्यायच्या आहेत. त्यासाठी बरीच भांडवली गुंतवणूक करावी लागणार आहे. कृषी विभागामार्फत प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत (पीएमएफएमई) १५ ते २० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य व कर्जासाठी प्रस्ताव तयार करणार आहे.

-सचिन गाढवे,माहिती अधिकारी, पुणे