सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : राज्य शासनाने गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने मिरज तालुक्यातील मालगाव येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील पात्र लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले.
आनंदाचा शिधा संच वितरण कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, मिरज प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे, तहसिलदार डी. एस. कुंभार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्यासह मालगाव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, गेल्या वर्षी दिवाळी सणानिमित्त शासनाने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना आनंदाचा शिधा संच वितरीत केला. याच धर्तीवर गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा शासन निर्णय घेतला आहे. या आनंदाच्या शिधामध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या बाबींचा समावेश आहे. आनंदाचा शिधा प्रतिसंच मात्र 100 रूपये या सवलतीच्या दराने पात्र लाभार्थींना मिळणार आहे. शिधा गुडीपाडव्यापासून एक महिन्यात वितरीत करावयाचा असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सांगली जिल्ह्यासाठी 3 लाख 98 हजार 946 आनंदाचा शिधा संच मंजूर झाले आहेत. यामध्ये सांगली 52 हजार 205, मिरज 45 हजार 310, कवठेमहांकाळ 23 हजार 85, जत 50 हजार 365, आटपाडी 22 हजार 756, कडेगाव 24 हजार 793, खानापूर–विटा 27 हजार 294, तासगाव 40 हजार 203, पलूस 27 हजार 94, वाळवा 46 हजार 952, आष्टा 13 हजार 216 व शिराळा तालुक्यासाठी 25 हजार 673 शिधा संचाचा समावेश आहे.
०००००