पीक मार्गदर्शनासाठी शेतीशाळा प्रभावी माध्यम

अमरावती, दि. 28 :  शेतकरी बांधवांना शेतातील पिकाविषयी प्रत्यक्ष माहिती, मार्गदर्शन देणारी शेतीशाळा हे प्रभावी ठरले आहे. कृषी उत्पादकतेत भर पडण्यासाठी आवश्यक बाबींचे प्रशिक्षणच याद्वारे मिळत असून, जिल्ह्यात कृषी विभागातर्फे चारशेहून अधिक शेतीशाळा घेण्यात आल्या आहेत.

प्रत्यक्ष शेतावर या शेतीशाळा घेण्यात येत असून, शेतक-यांकडून घेतले जाणा-या पिकांची परिपूर्ण माहिती व मार्गदर्शन त्यांना देण्यात येते. गावातील पीक क्षेत्र निवडून परिसरातील त्या पिकाचे उत्पादन घेणा-या शेतकरी बांधवांना एकत्र आणून त्यांना व्याख्याने व अधिकाधिक प्रात्यक्षिकातून अनुभवाधारित शिक्षण दिले जाते. आवश्यक तिथे अद्ययावत तंत्रज्ञानाचे पथदर्शी प्रात्यक्षिकही घेतले जाते. एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आदी बाबींचे धडे या शेतीशाळेतून मिळतात.

खरीप व रब्बी हंगामात पीकनिहाय शेतीशाळा घेतल्या जातात. गत वर्षभरात संत्रा फळपीकासाठी 131, कापूस पिकासाठी 28, सोयाबीनसाठी 112, तुरीसाठी 56, हरभ-यासाठी 6, ज्वारी व मूगासाठी प्रत्येकी 2 शेतीशाळा घेण्यात आल्या. धारणी व चिखलदरा तालुक्यात सावा व कुटकी पिकांसाठीही शेतीशाळा घेण्यात आली. त्याशिवाय, मूल्यविकास शाळाही आयोजित करण्यात आल्या. ‘स्मार्ट’तर्फे 60, ‘आत्मा’तर्फे 337 व कृषी विभागातर्फे 11 अशा एकूण 408 शेतीशाळा घेण्यात आल्याची माहिती ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी दिली.

कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे, या माध्यमातून शेतकरी बांधव एकत्र येत असल्याने चर्चेतूनही शंकांचे निरसन होते व अनेक बाबी आत्मसात होत जातात. शेतकरी समूह एकत्र येत असल्याने त्यांच्या गरजांवर आधारित कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम राबविण्यास प्रशासनालाही दिशा मिळते. प्रत्येक कृषी सहायकाच्या कार्यक्षेत्रात एक गाव निवडून तेथील प्रमुख पिकासाठी शेतीशाळेचे आयोजन होते. महिला कर्मचा-यांकडून महिला शेतक-यांसाठी शेतीशाळा घेतल्या जातात. शेतीशाळेसाठी लागणारे प्रशिक्षण साहित्यही यावेळी पुरवले जाते.

शेतीशाळेत प्रात्यक्षिक केल्यामुळे आवश्यक बाबी नेमक्या कळून शेतकरी निर्णयक्षम होण्यास मदत होते.  सहकार्याची भावना वाढीस लागते. उत्कृष्ट शेतीशाळा स्पर्धाही आयोजित केल्या जातात. त्यामुळे कर्मचा-यांना प्रोत्साहन मिळते, अशी प्रतिक्रिया श्रीमती निस्ताने यांनी दिली.