शासन स्तरावर नमो शेतकरी महासन्मान निधीचे नियोजन

नागपूर,दि. 29 :  राज्य शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पूर्ण वेळ शेतीवर विसंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये सानुग्रह निधी मिळणार आहे.

या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक सानुग्रह निधी मिळणार आहे. कृषी विषयक विपरीत परिस्थितीत असहायतेची भावना निर्माण होऊ नये, यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये मिळायचे. 2018 मध्ये केंद्र शासनाने ही योजना सुरु केली. तर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नव्याने घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र शासनातील योजनांचे 6 हजार व आता नमो शेतकरी महासन्मान निधीतून आणखी 6 हजार असा हा निधी 12 हजार झाला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा जाहीर केली आहे.  

लाभार्थी शेतकरी कोण ?

सामान्यत: या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती देण्यात आलेली आहे. 

महाराष्ट्रात 1.15 कोटीनागपूरमध्ये 80 हजार

नव्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जवळपास 1.15 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने ज्यांच्याकडे शेती आहे व ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट केले आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या जवळपास 80 हजाराच्या आसपास जाते आहे. राज्य शासनाला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 6 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना

शासनाच्या या नवीन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे. कारण यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये वार्षिक दिले जायचे; परंतु आता या नवीन योजना मुळे बारा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.