लोकराज्यचा मार्च २०२३ चा ‘अर्थसंकल्प’ विशेषांक प्रकाशित

मुंबई, दि. 29 : देशाच्या अमृतकाळातील पंचामृतावर आधारित अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, भरीव भांडवली पायाभूत सुविधांचा विकास, सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या पंचामृतांचा समावेश करण्यात आला आहे. या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने लोकराज्य मार्च 2023 या महिन्याच्या अर्थसंकल्प विशेषांकाचे प्रकाशन केले आहे.

या अर्थसंकल्पात शेतकरी कष्टकरी, महिला, तरुण व वंचित उपेक्षित घटकांना केंद्रस्थानी  ठेवण्यात आले आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा आणि समतोल न्याय देणारा तसेच राज्याला नव्या उंचीवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. तसेच राज्याला गडकिल्ल्यांचा वैभवशाली वारसा लाभलेला आहे. या वारशाची जपणूक, जतन आणि संरक्षण करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केलेली आहे. अशा अनेक घटकांसाठीच्या योजनांची माहिती  या विशेषांकात देण्यात आलेली आहे. यासोबतच ‘महिला विशेष’ लेख समाविष्ट केले असून महिलांचे आरोग्य शिक्षण, महिलांचा सर्वांगीण विकास, महिला सक्षमीकरण याविषयीचे लेख या बरोबरच मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती या अंकात देण्यात आली आहे.

हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच http://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.

 

लोकराज्य : मार्च २०२३ (अर्थसंकल्प विशेषांक)

http://mahasamvad.in/?p=92395

0000