जी २० परिषदेत जगातील सर्वोत्तम ‘माईल्ड’ कॉफीचे प्रदर्शन

मुंबई, दि. 29 : सुमारे 8 हजार कोटी रुपये किमतीची कॉफी भारतातून निर्यात होते, अशी माहिती कॉफी बोर्डाचे विपणन उपसंचालक डॉ. बाबू रेड्डी यांनी दिली. मुंबईत जी-20 च्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची बैठक सुरू आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे आयोजित या बैठकीकरिता आलेल्या सदस्यांसाठी प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यात केंद्र शासनाच्या कॉफी बोर्डच्या माध्यमातून भारतातील उच्च प्रतीची कॉफी प्रदर्शित करण्यात आली आहे.

भारतात उत्पादन आणि प्रक्रिया होणाऱ्या कॉफीविषयी अधिक माहिती देताना श्री. रेड्डी म्हणाले की, सुमारे १२० देशांमध्ये भारतातील कॉफी निर्यात होते. यात युरोप, मध्य पूर्व देशांमध्ये अधिक मागणी आहे. जगभरात तयार होणाऱ्या कॉफी उत्पादकांमध्ये भारताचा सातवा क्रमांक आहे. तर, जगभरातून कॉफी निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. सावलीत उगवलेली, हाताने तोडलेली आणि सूर्यप्रकाशात वाळवलेली ही ‘माईल्ड’ कॉफी जगभरातील कॉफी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. याबद्दलची अधिक माहिती https://indiacoffee.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जी 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान, भारतीय चहा महामंडळ, भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित केले आहे.

00000

अर्चना शंभरकर/विसंअ/