महापुरूषांचे आचार-विचार समाजासाठी प्रेरक – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगलीदि. 11, (जि. मा. का.) : महापुरुषांचे आचार-विचार समाजासाठी प्रेरक असून महापुरूषांच्या विचारांची कास धरूया, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जत येथे बोलताना केले.

जत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास खासदार संजय पाटील, आमदार विक्रम सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, राजरत्न आंबेडकर, जत संस्थानचे शार्दुलराजे डफळे, तहसीलदार जीवन बनसोडे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, पुतळा समितीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जत शहरात उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य आपणास लाभले याचा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अभिमान वाटतो.  बाबासाहेबांनी त्यांच्या विचारातून दीन  दुबळ्यांचा आवाज बुलंद केला. त्यांच्या लेखणीतून समाजाला नवी दिशा मिळाली. यामुळे त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करूया, असे आवाहन पालकमंत्री डॉ. खाडे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत हे उद्यान व पुतळा उभारण्यात आल्यामुळे जत शहरात बाबासाहेबांचे चिरंतन स्मारक झाले असून या पूर्णाकृती पुतळ्यामुळे जत शहराच्या वैभवात भर पडली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी काढले.

जत शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला याचा मनस्वी आनंद झाला आहे. उद्यान व पुतळा सुशोभीकरण  कामास आवश्यक ती सर्व मदत करू, अशी ग्वाही खासदार संजय पाटील यांनी यावेळी दिली.

बऱ्याच वर्षानंतर जत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा राहिला आहे, याचा जतकर म्हणून अभिमान वाटतो. जत शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारण्यात जतसह तालुक्यातील मान्यवर व नागरिकांचे योगदान मोठे आहे, असे आमदार विक्रम सावंत यावेळी बोलतांना म्हणाले.

महापुरुषांनी त्यांच्या कार्यातून समाजाला नवी दिशा दिली आहे. त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करून महापुरूषांच्या विचारांचा सोहळा साजरा करूया, असे माजी आमदार विलासराव जगताप यांनी यावेळी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करूया. त्यांचे पुतळे व स्मारकातून सकारात्मक ऊर्जा घेऊन  हे विचार समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी बोलतांना केले.

कार्यक्रमात सी. आर. सांगलीकर, दीपक केदार, अतुल कांबळे, राहुल सरवदे, संजीव सदाफुले यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी संजय कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक  केले.

०००