जळगाव मेडिकल हबच्या कामांना गती मिळणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. 12 : जळगाव येथे मेडिकल हबसाठी पाणी, वीज, रस्ता, जमीन अधिग्रहणसंदर्भात सर्व परवानग्या तत्काळ घेऊन पुढील कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.

जळगाव मेडिकल हबच्या कामाच्या आढावा संदर्भात बैठकीचे आयोजन सेवासदन या शासकीय निवासस्थानी करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. महाजन बोलत होते. या बैठकीस विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उप सचिव  प्रकाश सुरवसे, अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, अवर सचिव सुनील कुमार धोंडे, आयुषचे संचालक डॉ. रमण घुंगराळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, मेडिकल हबसाठीच्या मौजे चिंचोली येथील जागेवर रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शासनाच्या जमिनीवर रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी परवानगीचा प्रस्ताव त्वरित सादर करावा. तसेच, बांधकाम करण्यास लागणारा पाणी, वीज पुरवठा व्हावा यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेऊन काम सुरू करण्याचे निर्देश संबंधित संस्थांना दिले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, वसतिगृह, निवासस्थानांना वाघूर धरणातील पाणी देण्याबाबत पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करावी. चंद्रपूर, जळगाव येथील वसतिगृहांच्या क्षमता वाढविण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत सूचना देखील त्यांनी दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/