पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड

मुंबई, दि. 21 : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे राज्यपाल तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष कलराज मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच झालेल्या बैठकीत कार्यकारी समितीने एकमताने मंत्री श्री.मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली.

मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या नियुक्ती संदर्भात केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता यांनी पत्र पाठविले आहे. तसेच कार्यक्रम समितीच्या बैठकीचे नेतृत्व करण्याचीही विनंती त्यांनी केली आहे. श्री.मुनगंटीवार यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या अंतर्गत राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांचा तसेच दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. भारतीय पारंपरिक लोककलांना प्रोत्साहन देण्याची या सांस्कृतिक केंद्रांची जवळपास साडेतीन दशकांची परंपरा आहे. भारत- सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली देशात सात क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांचे कार्य चालते.

००००