नूतन इमारतीतील अद्ययावत सुविधांचा न्यायालयीन प्रकरणे जलद गतीने सोडविण्यासाठी वापर करा – न्यायमुर्ती संजय व्ही. गंगापुरवाला

मुंबई दि. २२ : सद्यस्थितीतील न्यायालयीन प्रणाली व त्या अनुषंगाने या नुतन इमारतीतील अद्ययावत सुविधा यांचा न्यायालयीन प्रकरणे जलद गतीने चालविण्यासाठी वापर करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायमुर्ती संजय व्ही. गंगापुरवाला यांनी सांगितले.

माझगाव येथील नगर दिवाणी व सत्र न्यायालय तथा मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या नुतन वास्तुचा लोकार्पण सोहळा न्यायमुर्ती श्री. गंगापुरवाला यांच्या हस्ते आज झाला.

यावेळी उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमुर्ती के.आर. श्रीराम, न्यायमुर्ती एम.एस. कर्णिक, न्यायमुर्ती कमल आर खाटा, न्यायमुर्ती श्रीमती. शर्मिला यु. देशमुख, न्यायमुर्ती श्रीमती. डॉ. नीला गोखले उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र व गोवा बार काउंसिलचे सदस्य तसेच नगर दिवाणी व सत्र न्यायालय वकील संघ, माझगाव न्यायालय वकील संघ व बॅलार्ड पियर वकील संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

श्री. गंगापुरवाला यांनी सांगितले की, न्यायालयाची ही कलात्मक वास्तु सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य व विद्युत अभियंते तसेच वास्तु विशारद यांच्या एकत्रित प्रयत्नातून निर्माण झाली आहे. या इमारतीच्या निर्मीतीसाठी मा. उच्च न्यायालयाच्या इमारत समितीने दिलेले योगदानही विसरता येणार नाही. ही नवीन इमारत काळाची गरज असून सर्व अद्ययावत सेवा सुविधांनी सज्ज आहे. यावेळी त्यांनी न्यायमुर्ती श्रीमती रेवती माहिते डेरे तसेच महाराष्ट्र व गोवा बार काउंसिलच्या प्रयत्नांचाही आवर्जुन उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, मा. उच्च न्यायालयाने हाती घेतलेल्या ई- फायलींगची सुविधाही या नुतन इमारतीत करण्यात आलेली आहे. प्रलंबित प्रकरणांच्या वाढत्या आकड्याला नियंत्रणात आणण्यासाठी आमचे न्यायाधीश सक्षम आहेत. परंतू आता वकील वृंद व सर्वांनी वैकल्पिक वादनिवारण यंत्रणेकडेही लक्ष केंद्रीत केले पाहिजे. या विचारासह न्यायमुर्ती श्री. संजय व्ही. गंगापुरवाला यांनी माझगाव नुतन वास्तुचे उद्घाटन झाले असे घोषित केले.

यावेळी न्यायमुर्ती श्री. के. आर. श्रीराम, माझगाव वकील संघाचे अध्यक्ष श्री. टी. आर. वर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्ष जलसिंचनाने झाली. तर नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री. अनिल सुब्रम्हणियम यांनी स्वागत केले.

माझगाव न्यायालयाची ही 17 मजल्यांची नुतन वास्तु सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या सर्व न्यायालयीन इमारतींपेक्षा उंच इमारत असून अतिशय रेखीव आहे. या इमारतीत सर्व अत्याधुनिक यंत्रणेसह पक्षकार व वकिलांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या इमारतीत 42 न्यायदालनातील मध्यवर्ती वातानूकुलन यंत्रणा सौर उर्जेवर कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. दिव्यांग अनुकुल सेवेसह त्यांच्या वापरासाठी व्हिल चेअर्सची अद्यवत व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय वातानुकूलित 100 आसनी सभागृह व अद्यवत संगणक प्रणाली ही या इमारतीची वैशिष्टये आहेत.

000