मुंबई, दि. २५ : महाराष्ट्राला शिक्षणाची प्रदीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातून घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व ‘स्टार्स’ प्रकल्प अंतर्गत शाळापूर्व तयारी अभियान-२०२३ ‘पहिले पाऊल’ शाळास्तर उद्घाटन मेळावा आज (दिनांक २५ एप्रिल २०२३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरळी सी फेस शाळेमध्ये पार पडला. यानिमित्ताने सदर उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. केसरकर बोलत होते.
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री श्रीमती निशिगंधा वाड, मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक संदीप संगवे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण उपसंचालक श्रीमती मनीषा पवार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी श्रीमती मालती टोणपे, प्रथम संस्थेच्या सचिव श्रीमती फरिदा लांबे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.केसरकर म्हणाले की, मातृभाषेचा सतत अभिमान बाळगायला हवा. ज्या देशांनी मातृभाषेचे महत्त्व वेळीच ओळखले त्या देशांनी प्रगती केली. त्यामुळे आपण आपली मातृभाषा म्हणजेच माय मराठीतूनच शिक्षण घ्यायला हवे. रशिया, फ्रान्स, जर्मनी, इस्त्राइल या देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. कारण त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मातृभाषेचा आग्रह धरला. इंग्रजी ही केवळ आंतरराष्ट्रीय संवाद साधण्याची भाषा आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठीतून अभियांत्रिकी, वैद्यकीय हे अभ्यासक्रम इंग्रजीसह त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकविले जाणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आतापासूनच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम निर्माण करा, असे आवाहनही श्री. केसरकर यांनी केले.
व्यावसायिक शिक्षण मोलाचे
भारत हा तरूणांचा देश आहे. आपल्या देशातील तरूणांना स्वावलंबी करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण मोलाचे आहे. त्यामुळे येणारी पिढी ही तंत्रकुशल असायला हवी, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. राज्य शासन तरूणांना रोजगार मिळावा, यासाठीच्या उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीच्या सर्व मुलांना गणवेश, बूट-मोजे, वह्या-पुस्तके शासनामार्फत दिली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
‘पहिले पाऊल’ ठरणार ऐतिहासिक पाऊल
शिक्षण विभागातील ‘पहिले पाऊल’ हा उपक्रम ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे सांगून मुलांसाठी प्रशासनाने सुरू केलेली ही पूर्वतयारी त्यांच्या भविष्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार असा विश्वास अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केला. ‘पहिले पाऊल’ या उपक्रमात खारीचा वाटा उचलण्याची अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तयारी दर्शविल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. येत्या २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असाच कार्यक्रम होणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांनी उपस्थित चिमुकल्यांशी संवाद साधला. सेल्फी घेताना श्री. केसरकर यांनी चिमुकल्यांना उचलून घेतले. त्यामुळे लहानग्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मान्यवरांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रवेशपात्र मुलांच्या क्षमतांची तपासणी करण्यासाठी मांडण्यात आलेल्या विविध संचांना भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती निशा म्हात्रे यांनी संयोजन केले. किसन पावडे यांनी सूत्रसंचालन केले.
00000
बी.सी.झंवर/विसंअ