महाराष्ट्र दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

0
5

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 1 मे रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी सहसचिव तथा सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि राज्यगीत गाऊन राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली.

सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार), महाराष्ट्र राज्य यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग, पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या रंगीत तालमीत राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, निशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक, बृहन्मुंबई पोलीस दलाची वाहने (महिला निर्भया पथक), बृहन्मुंबई अग्निशमन दल वाहने (आर्टिक्युलेटेड वॉटर टॉवर आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर) यांनी संचलनात सहभाग घेतला.

उत्कृष्ट संचलन पुरस्कार

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 26 जानेवारी 2023 रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अनुप कुमार सिंग यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी 60 पथकाने प्रथम क्रमांक, राज्य राखीव पोलीस बल ने द्वितीय तर बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट संचलनासाठी रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर, मुंबई यांनी प्रथम तर भारत स्काऊट आणि गाईड्स बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर आणि शिबानी जोशी यांनी केले. किरण शिंदे, अरूण शिंदे, विवेक शिंदे यांच्या पथकाने सनई चौघडा वादनाने तर पांडुरंग गुरव यांच्या पथकाने तुतारी वादनाने वातावरण निर्मिती केली.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here