सामाजिक कार्य करताना “नाम फाऊंडेशन” चा आदर्श घ्यावा – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि.३० (जिमाका) : समाजाप्रति काम करताना, सामाजिक कार्य करताना भविष्यात “नाम फाऊंडेशन” चा आदर्श पुढे घेवूनच जावे लागेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पावस येथे केले.

महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग, जिल्हा नियोजन समिती व “नाम फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने आज मौजे पावस येथे गौतमी नदी रुंदीकरण व खोलीकरण शुभारंभ सोहळा ज्येष्ठ अभिनेते तथा “नाम फाऊंडेशन” चे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर व लोकप्रिय विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सुप्रसिध्द दिग्दर्शक अभिजीत पानसे, मल्हार पाटेकर यांच्यासह जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता, वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता जावेद काझी, पावस ग्रामपंचायत सरपंच चेतना सामंत, ग्रामस्थ आणि नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले, रत्नागिरीतील 7 नद्यांचा गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात येत आहे. आज कोकणामध्ये प्राधान्याने करावयाचे काम म्हणजे नद्यांमधील गाळ काढणे, तेथील जनतेला, वाडया-वस्तींना पूर समस्येपासून सुरक्षित करणे, हे आहे. गेल्या काही वर्षांपासून हे काम “नाम फाऊंडेशन” धडाडीने करीत आहे. त्यामुळे समाजाप्रति सामाजिक कार्य करताना भविष्यात “नाम फाऊंडेशन” चा आदर्श घेवूनच पुढे जावे लागेल.

ते म्हणाले, दोन वर्षापूर्वी चिपळूण शहर येथे भयंकर पूर आला होता. त्यावेळी प्रशासन आणि “नाम फाऊंडेशन” च्या माध्यमातून वशिष्ठी नदीतील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला. मागच्या वर्षीही आधीच्या वर्षीप्रमाणेच भरपूर पाऊस पडला परंतु यावेळी पूर आला नाही. याचे खरे श्रेय प्रशासनासोबत “नाम फाऊंडेशन” चे आहे. राजकारण्यांशी थेट संवाद साधणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे, त्यांना सडेतोड प्रश्न विचारणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नाना पाटेकर आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन करणारे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र हे रत्नागिरी मध्ये साकार होत आहे. त्याच्या उद्घाटनाला आपण यावे, असे निमंत्रण पालकमंत्री उदय सामंत यांनी नाना पाटेकर यांना दिले. भविष्यात “नाम फाऊंडेशन” आणि शासन असे एकत्रित मिळून काही करता येईल, यासाठी आपण प्रयत्न करु. ज्या पध्दतीने आपण एक वेगळा पायंडा आपल्या कामांतून मांडलेला आहे, आदर्श उभा केला आहे, त्याचे शासनाने देखील अनुकरण करणे गरजेचे आहे आणि याच भावनेतून एखादा सामंजस्य करार (MOU) करता आला तर त्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असे आश्वासन श्री.सामंत यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना नाना पाटेकर म्हणाले, प्रशासन आणि “नाम फाऊंडेशन” माध्यमातून पावस येथे गौतमी नदीचे गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. परंतु ही नदी पुन्हा प्रदूषित होणार नाही, नदीमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही, याची काळजी घेणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. नदीमध्ये गाळ साठून नदी कोरडी व प्रदूषित होते, आणि पाणी बाजारपेठेत शिरण्यापर्यंत आपण वाट बघायलाच नको. शासन – प्रशासन त्यांचे काम करीत असते मात्र नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे की, पुन्हा ही नदी प्रदूषित होणार नाही.

ते पुढे म्हणाले, नाम फाऊंडेशन म्हणजे आम्ही नाही तर आपण सर्व मिळून आहोत. हे फाऊंडेशन आपल्यामुळेच उभे आहे. टाटासारखी संस्था आता “नाम”शी जोडली गेली आहे. लवकरच उद्योगपती अजीज प्रेमजी आपल्या या फाऊंडेशनसोबत करार करणार आहेत. नागरिकांच्या समस्या मिटविणे, त्यांची सोय होणे गरजेचे आहे परंतु सुविधा उपलब्ध झाल्यानंतर त्या उपलब्ध सुविधेची काळजी लोकसहभागातून घेणे, ही तुमची-आमची सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. “नाम फाऊंडेशन” च्या माध्यमातून 42 कि.मी. म्हाडा नदीचा गाळ काढल्याने तेथे निर्माण झालेल्या समृध्दीची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

शासकीय सेवेत असलेली मुले या अभियानाचे खरे आधारस्तंभ असून प्रशासन म्हणून, प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह हे करीत असलेल्या कामांचे श्री. पाटेकर यांनी यावेळी विशेष कौतुक केले.

श्री.अनासपुरे यांनी आपल्या मनोगतपर भाषणामध्ये “नाम फाऊंडेशन” च्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
0000000