जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तीन दिवसात ११६७ हेक्टर नुकसान, शासन स्तरावरून लवकरच मदत – पालकमंत्री गिरीष महाजन

जिल्ह्यात चार दिवसात पाच व्यक्ति आणि 100 जनावरे दगावली

लातूर दि.30 (जिमाका) :- शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अशा अवकाळी पावसामुळे हिरावला जातो आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आपण सगळे निसर्गापुढे हतबल आहोत. या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मार्चमध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी 10 कोटी 77 लाख रुपये मदत दिली आहे. मागच्या चार दिवसात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वीज पडून जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. त्यात पाच व्यक्तींचा मृत्यू, 100 जनावरे मयत झाले आहेत. 1 हजार 167 हेक्टर एवढ्या शेत जमिनीवरील फळपिकं, हंगामी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. शासन स्तरावरून यासाठीही सर्वोत्तोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास, क्रीडा, वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

आज चिंचोली काजळे ता. औसा येथील हणमंत गोविंदाचार्य उपाध्याय यांच्या शेतातील आंब्याच्या बागेचे झालेले नुकसानीची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत खा. सुधाकर शृंगारे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., गुरुनाथ मगे, शिवदास मिटकरी, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

टेंबी ता. औसा येथील शेतकरी शौकत इस्माईल सय्यद हे दि.28 एप्रिल रोजी वीज पडून मयत झाले आहेत. त्यांच्या घरी जाऊन त्यांची तीन मुलं आणि कुटूंबियांचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांत्वन केले. शासन स्तरावरील मदत तात्काळ द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना यावेळी दिल्या.

या पाहणी दौऱ्यानंतर झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्ह्यात सलग दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी व गारपीटीशी सामना करावा लागत आहे. 25 एप्रिलपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळ – वारा व काही भागात गारपिटीमुळे काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पाच व्यक्ति आणि 100 जनावरे दगावले आहेत. हे सगळे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पालकमंत्र्यांना दिली.

या बैठकीला खा. सुधाकर शृंगारे, आ.अभिमन्यू पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी व गारपिटीची शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. त्यानंतर तात्काळ नुकसान झालेल्या 22 हजार 191 शेतकऱ्यांच्या या नुकसानी पोटी शासनाने 10 कोटी 7 लाख 77 हजार एवढा निधी मंजूर केला. ही मदत बाधित शेतकऱ्यांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा घेतला आढावा

जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पात 45 टक्के पाणीसाठा आहे, तर निम्न तेरणा प्रकल्पात 53.17 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील एकूण 8 मध्यम प्रकल्पात 34.54 एवढा तर 128 लघु प्रकल्पात 24.52 टक्के एवढा पाणी साठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अभिजित म्हात्रे यांनी दिली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन महिने उशिरा पाऊस सुरु होईल. त्यामुळे पाण्याची काटकसर करण्याची सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी प्रशासनाला दिली.
**