महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन 

0
5

पुणे दि.१: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन  करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धून वादन करण्यात आली. राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अनमोल मित्तल यांनी केले. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल, पुणे शहर गुन्हे शाखेचे श्वान पथक, पोलीस दलाचे डायल- ११२ पोलीस वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक, पुणे मनपा अग्नीशमन दल, वैद्यकीय सेवेच्या डायल १०८ सेवेतील वाहन आदींनी यावेळी संचलनात भाग घेतला.

पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी विविध पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले. पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त आणि तत्कालीन पोलीस उप महानिरीक्षक गुन्हे शाखा रंजन कुमार शर्मा यांना एनसीआरबी नवी दिल्ली यांच्याकडून सीसीटीएनएस प्रणालीबद्दल सादरीकरणाबद्दल मिळालेले प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. ग्रामपंचायत टिकेकरवाडी (ता. जुन्नर) यांना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहानिमित्त केंद्र शासनाचा ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्काराबद्दल सन्मान करण्यात आला. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आले. तसेच कामगार आयुक्ताल यांच्याकडील पुरस्कार पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक यांना, उद्योजकांना जिल्हा उद्योग केंद्राचे पुरस्कार, महसूल विभाग आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध विभागात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रही यावेळी प्रदान करण्यात आले.

पोलीस वाहनांचे हस्तांतरण

जिल्हा नियोजन समितीतून दिलेल्या २ कोटी रुपयांच्या निधीतून पुणे शहर पोलीस आयुक्तालयासाठी घेण्यात आलेल्या 24 चारचाकी पोलीस वाहनांचे हस्तांतरण शहर पोलीस दलाला पालकमंत्री श्री. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून अधिकाधिक निधी देण्यात येईल, असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हा व राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे- पालकमंत्री

महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती, गड-किल्ले, सुधारक आणि क्रांतीकारी विचार, इथला इतिहास,  शैक्षणिक परंपरा हे आपले वैभव आहे. हे वैभव जपताना समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवित राज्याला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न शासनाचा असून जिल्हा आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमीत्त तसेच कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, अमृतकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात शाश्वत शेती- समृद्ध शेतकरी; सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास; पायाभूत सुविधांचा विकास; सक्षम कुशल रोजगारक्षम युवा घडवणे आणि रोजगारनिर्मिती; पर्यावरणपूरक विकास ही ध्येये साध्य करण्यासाठी योग्य नियोजन समाविष्ट करण्यात आले.

जिल्ह्यातील पायाभूत विकासासह ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या विकासाला  गती देण्यात येत आहे. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ असलेल्या हवेली तालुक्यातील तुळापूर आणि शिरुर तालुक्यातील समाधीस्थळ वढू (बु.) येथील स्मारकाच्या विकासकामांची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. भिडेवाडा येथे  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

शासनाने कायमच शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य दिले असल्याचे सांगून श्री. पाटील पुढे म्हणाले, गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजेच ४ हजार २६८ कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. सलग दोन वर्षे पीक कर्जवाटपाचा नवा उच्चांक गाठण्यात आपल्याला यश आले आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राच्या विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. जलयुक्त शिवार २.० अभियान राबविण्यात मान्यता देण्यात आली असून ही योजना जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यांमध्ये उद्योजकांचा सहभाग वाढावा आणि अधिकाधिक उमेदवारांना रोजगार मिळावा प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जिल्ह्यातील नामांकित उद्योग, उद्योग संघटना, प्लेसमेंट एजन्सीज यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघात येत्या ५ मे ते ६ जूनपर्यंत मोफत व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्याचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यातील विविध विकासकामे, जी 20 परिषदेचे आयोजन, शिक्षण क्षेत्रातील महत्वाचे निर्णय, ग्रामविकासाची कामे आदींचा उल्लेख करून जिल्हा आणि राज्याच्या विकासासाठी नागरिकांनी योगदान देण्याचे आवाहन पालकमंत्री श्री.पाटील यांनी केले.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here