पर्यटन जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला ओळख मिळवून देणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 1-सातारा जिल्ह्यात पर्यटनाच्या वाढीला मोठा वाव असून पर्यटन जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी  अधिकारी  ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

विस्तारित महाबळेश्वर पर्यटन क्षेत्र तापोळा परिसरात विकसित करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,  कास, बामणोली, कोयना अशा अनेक पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. या माध्यमातून एक आदर्श पर्यटन जिल्हा म्हणून साताराची ओळख निर्माण करण्यात येईल.  जिह्यातील प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवण्यात येतील.  जिल्ह्याने राज्याला भक्कम असे नेतृत्व देण्याचे काम केले आहे. आपला जिल्हा हा क्रांतिकारकांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा व सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्याला दिशा देण्याचे काम ही सातारा जिल्ह्याने केले आहे. जिल्ह्याने सर्वच क्षेत्रात भरीव क्रांती केली आहे. सहकार, औद्योगिक क्षेत्रात प्रगती साधली आहे. सहकाराच्या माध्यमातून साखर उद्योग, दूध उत्पादन यासह बँकिंग क्षेत्रातील भरीव काम केले आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हा नियोजनच्या ४६० कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, जिल्हा नियोजनच्या निधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहेत. तसेच स्मार्ट प्राथमिक शाळाही उभारण्यात येत आहेत.  विकासात राज्यातील अग्रेसर जिल्हा निर्माण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे.  कामगारांच्या हिताचे निर्णय शासन घेईल, असे प्रतिपादनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

यावेळी पालकमंत्री श्री देसाई यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये आदर्श तलाठी पुरस्कार, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांचे पुरस्कार व महिला बाल विकास विभागाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैयक्तिक जिल्हास्तरीय पुरस्कार, तसेच राज्य उत्पादन शुल्क, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, राज्य उपायुक्त (प्रशासन), जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयातील नियुक्ती आदेशाचे वाटप, सामाजिक न्यायपर्व पुस्तिका व यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000