पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
4

पुणे, दि. १: पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून तसेच कंपन्यांचे सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे ग्रामीण पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या पोलीस वाहनांच्या हस्तांतरण कार्यक्रमात मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे आदी उपस्थित होते.

देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदल आणि पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी अधिकाधिक खर्च केला पाहिजे, असे विचार व्यक्त करुन श्री. पाटील म्हणाले, गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी पोलीस विभाग अद्ययावत करण्यासाठी डीपीडीसीतून भरीव निधी देण्यात येईल. त्यातून केवळ वाहनेच नव्हे तर अत्याधुनिक साधनसामुग्री, सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर, सीसीटीव्ही यंत्रणा आदींवर भर देण्यात यावा. पोलीसांची निवासस्थाने, कार्यालयांचे अद्ययावतीकरण यासाठीदेखील निधी देऊ. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण आदींसाठी पोलीस दलानेही पोलीस कल्याण निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. गोयल यांनी प्रास्ताविकात पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीतून दिलेल्या २ कोटी रुपयांच्या निधीतून पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी ९ स्कॉर्पिओ व ९ बोलेरो अशी १८ चारचाकी वाहने आणि ६ मोटारसायकल  घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या वाहनांचे हस्तांतरण तसेच तयार करण्यात आलेल्या नवीन टेनिस कोर्टचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here