आदिवासी उद्योजकांना प्रक्रिया उद्योगांसाठी आर्थिक पाठबळ देणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नाशिक, दिनांक 11 मे, २०२३ (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील आदिवासी भागात वनसंपत्ती विपुल प्रमाणात आहेत. उपलब्ध वनसंपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था पुढे येत आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या रावसाहेब थोरात सभागृह येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांचा सामंजस्य करार सोहळा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक बाबासाहेब शिंदे, व्यवस्थापक (लेखा) मनोजकुमार शर्मा, संचालक विकास वळवी यांच्यासह विविध संस्था व बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ.गावित म्हणाले, आदिवासी बांधवांना उद्योजकतेच्या प्रशिक्षणातून व्यवसाय उपलब्ध करून त्यांना आर्थिक सक्षम कसे करता येईल यादृष्टीने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यरत आहे. त्यानुसार बचतगट, वनधन केंद्र, ग्रामीण समूह, फळ प्रक्रिया उद्योजक, राईस मिल, वनऔषधी उद्योजक, गृहोद्योग यांना आवश्यक वित्त पुरवठा करण्यात शबरी महामंडळ अग्रेसर आहे. येणाऱ्या काळात आदिवासी बांधवांनी प्रक्रिया उद्योगातून तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले.

मंत्री डॉ. विजयकुमार गावित पुढे म्हणाले, ज्या भागात जे वनउपज उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग आदिवासी बांधवांनी आपल्या उद्योगासाठी केला पाहिजे. उद्योगासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. आदिवासी विकास विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जात असून आदिवासी महिला उद्योजक सुद्धा पुढे येत आहेत. परिश्रम व सहभागातून आगामी काळात आदिवासी बांधव नक्कीच यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला येतील यात शंका नाही, असा विश्वास मंत्री डॉ. गावित यांनी व्यक्त केला.

यावेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, एन. डी. गावित, रायासिंग वळवी, रमेश सवरा, चैराम पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत 10 स्वयंसहाय्यता बचत गटांना रूपये पाच लाख कर्ज मंजुरी आदेशांचे वितरण आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

.क्र बचत गटाचे नाव पत्ता व्यवसायाचे नाव कर्ज मंजुर रक्कम
1 जयभोले स्वयंसहायता बचत गट पोस्ट आड ता. पेठ जि. नाशिक कुक्कुटपालन 5,00,000
2 जिवदानी महिला स्वयंसहायता बचत गट पोस्ट चोलमुख ता. पेठ जि. नाशिक विट भट्टी 5,00,000
3 जय जनार्दन स्वंयसहायता बचत गट पोस्ट खिरकडे ता.पेठ जि.नाशिक विट भट्टी 5,00,000
4 नम्रता स्वयंसहायता बचत गट पोस्ट खिरकडे ता.पेठ जि.नाशिक कुक्कुटपालन 5,00,000
5 कल्याणी स्वयंसहायता बचत गट पोस्ट अंजनेरी ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक शेळीपालन 5,00,000
6 दुर्गा स्वयंसहायता बजत गट पोस्ट खिरकडे ता.पेठ जि.नाशिक कुक्कुटपालन 5,00,000
7 संजिवानी महिला समुह बचत गट तिर्डे, पोस्ट कोपर्ली (दु) ता. पेठ, जि. नाशिक कुक्कुटपालन 5,00,000
8 जीवन महिला बचत गट पोस्ट कोहेर ता. पेठ जि. नाशिक विट भट्टी 5,00,000
9 राणी लक्ष्मीबाई महिला बचत गट चिंचवोहळ ता. त्र्यंबकेश्वर, जि. ना‍शिक हॉटेल ढाबा 5,00,000
10 पूर्वा समूह बचत गट पोस्ट कोहेर ता. पेठ जि. नाशिक कुक्कुटपालन 5,00,000