उदयपूर/चंद्रपूर, दि. 15 मे 2023: पश्चिम क्षेत्रातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लुप्त होणाऱ्या कला कौशल्यांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आखण्याचा निर्णय शनिवारी येथे झालेल्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. यासाठी पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यांतून त्या त्या राज्यातील लुप्त होत चाललेल्या कला कौशल्यांचे दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र देशात अव्वल क्रमांकावर राहावे यासाठीही श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत अनेक उपयुक्त सूचना केल्या.
शनिवारी उदयपूर येथे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीची वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीला समितीचे नूतन अध्यक्ष ना.श्री सुधीर मुनगंटीवार, प.क्षे.सां.केंद्राच्या संचालिका श्रीमती किरण सोनी गुप्ता, श्री संतोष जोशी, श्री अशोक परब, प्रा.युगांक नाईक प्रत्यक्षात उपस्थित होते. तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव श्री विकास खारगे यांच्यासह इतर सदस्य राज्यातील शासकीय अधिकारी आणि इतर अशासकीय सदस्य दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री. मुनगंटीवार यांनी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रमांसाठी व योजनांसाठी सीएसआरमधून निधी मिळविण्यासाठी कसे प्रयत्न करावेत यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले. सीएसआर निधीमुळे यापुढे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या विविध योजनांना निधीची कमतरता जाणवणार नाही, असे ते म्हणाले. या बैठकीत इतर अनेक महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले.
सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक ज्ञान विकीपीडियावर आणणार
पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यांकडे मोठा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक ज्ञानाचा खजिना असून या सांस्कृतिक वारशाची तसेच पारंपरिक ज्ञान व साहित्याची माहिती विकीपेडीयावर नवीन पिढीला उपलब्ध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिल्या. यासंदर्भात विकीपीडियाचे जागतिक संचालक श्री. होरे वर्गीस आणि त्यांच्या चमूने या बैठकीसमोर सादरीकरण केले.
कलाकारांचे मानधन वाढविण्याचा प्रयत्न
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राशी संबंधित योजना आणि कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कलाकारांचे मानधन अनेक वर्षे वाढवले गेलेले नाही. हे मानधन काळानुरूप वाढविण्यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक खात्याला शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याची माहिती श्री मुनगंटीवार यांनी दिली.
देशातील इतर क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राशी समन्वय निर्माण करणार
देशातील विविध भागात असलेल्या विविधतेतही सांस्कृतिक एकता विद्यमान आहे. त्यामुळेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या विविध योजना आणि कार्यक्रमांचे आयोजन करताना देशातील इतर क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांशी सांस्कृतिक कार्य विषयात योग्य तो समन्वय साधला जायला हवा असे ना.श्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत सांगितले.
गेट वे ऑफ इंडिया येथे दर सप्ताहात होणार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
भारतात येणारे परदेशी पर्यटक तसेच देशांतर्गत पर्यटक मोठ्या प्रमाणात गेट वे ऑफ इंडिया येथे भेट देत असतात. त्यांच्यासमोर पश्चिम क्षेत्रातील चार राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण केल्यास या भागातील कला कौशल्यांच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक पातळीवर पोहोचवणे सोपे जाईल, असे मत ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले. त्याला समिती सदस्यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार गेट वे ऑफ इंडिया येथे दर आठवड्यात शनिवार रविवारी सहा सदस्य राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची कायमस्वरूपी योजना आखण्याची जबाबदारी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री विकास खारगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे इतर अधिकारी आणि इतर अशासकीय सदस्य त्यांना मदत करतील.
पंढरपूर येथे होणार भक्तीसंस्कृती संमेलन
राज्यातील वारकरी संप्रदाय आणि भक्तीसंस्कृती ची माहिती देशातील इतर राज्यांना व्हावी या करता पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे कार्तिकी वारीच्या काळात पंढरपुरात राष्ट्रीय भक्तीसंस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री बिभीषण चवरे या कामात पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला मदत करणार आहेत.
नागपूर येथे व्याघ्र परिषद
पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यातील व्याघ्र प्रकल्प, त्यातील गावे, तिथली निसर्गप्रेमी संस्कृती यांची माहिती जगाला करून देण्यासाठी नागपूर येथे व्याघ्र परिषद घेण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
पश्चिम क्षेत्राचे सांस्कृतिक गीत बनविणार
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे स्वतःचे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक गीत तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेतला गेला.
पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांचे संमेलन
पश्चिम क्षेत्रातील भारत रत्न आणि पद्म पुरस्कार प्राप्त सर्व कलाकारांचे संमेलन आयोजित करण्याच्या सूचना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. या संमेलनात केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांसह पश्चिम क्षेत्रातील सर्व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच वरीष्ठ अधिकारी यांना निमंत्रित केले जाणार आहे. या संमेलनात या पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांसोबत थेट चर्चा करून सांस्कृतिक क्षेत्रासंबंधी त्यांच्या सूचना समजून घेतल्या जातील.
प्रत्येक राज्याच्या नावावर किमान एक तरी गिनीज जागतिक विक्रम असावा
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सदस्य राज्यांपैकी प्रत्येक राज्याच्या नावाने सांस्कृतिक क्षेत्रातील एक तरी गिनीज जागतिक विक्रम असला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिल्या आहेत.
पश्चिम क्षेत्रातील गड किल्ल्यांविषयी विशेष कार्यक्रम
पश्चिम क्षेत्रातील प्रत्येक राज्याला चांगला ऐतिहासिक वारसा असून त्यातील गड किल्ल्यांशी अनेक ऐतिहासिक कथा जोडल्या आहेत. त्या कथांसह या गडकिल्ल्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी म्हणून विशेष योजना आखण्याचे निर्देश श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रशासनाला दिले आहेत.
पुढची बैठक मुंबईत
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीची पुढील बैठक मुंबईत जून अखेर किंवा जुलै पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही श्री. मुनगंटीवार यांनी केली.