टंचाईमुक्तीसाठी ‘जलयुक्त शिवार’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन विविध लोककल्याणकारी योजना व अभियान राबवित आहे. यापैकी एक म्हणजे जलयुक्त शिवार अभियान होय.  दुष्काळी परिस्थितीवर मात करता यावी, या प्रमुख उद्देशाने या अभियानाचा दुसरा टप्पा राज्यभर राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाची कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न नागपूर जिल्ह्यात सुरू आहे.  

राज्यात पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो. राज्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या जमिनीचे मोठे प्रमाण, अनिश्चित व खंडित पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या बाबी विचारात घेऊन टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा सन 2015-16 पासून ते सन 2018-19 पर्यंत राबविण्यात आला. यंदा आता या अभियानाचा दुसरा टप्पा जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यात येत आहे.

जलयुक्त शिवार अभियान २.० या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात कामे न झालेल्या उर्वरित गावामध्ये मृद व जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. शिवारफेरी, जलसाक्षरता, लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा आणि प्रत्येक तालुकानिहाय समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावागावात जलयुक्त शिवाराने शेतकऱ्यांना पाण्याचे योग्य नियोजन करून आर्थिक उत्पन्नवाढीबरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जिल्ह्यात प्रभावीपणे अभियान राबविण्यात येणार आहे.

जलसंधारण क्षेत्रातील राज्याच्या कार्यासाठी केंद्र शासनातर्फे महाराष्ट्राला अलीकडेच पुरस्कृत करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार-२ मध्ये कमी पाऊस पडणाऱ्या ठिकाणी हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  जिल्ह्यामध्ये सुमारे अडीचशे गावांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे.

तलावांचे खोलीकरण, नाल्यांचे रुंदीकरण व बंधारा बांधकाम या कामांना गती देण्यात येणार आहे. कुठल्याही योजना वा अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग हा महत्वपूर्ण असतो. लोकसहभाग अधिकाधिक कसा वाढविता येईल, यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.  या कामांमध्ये स्वयंसेवी संस्थांना मोठ्या संख्येने सहभागी करण्याचा प्रयत्न आहे.

जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर हे स्वतः संपूर्ण अभियानावर लक्ष ठेवून आहेत. राज्यातील जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा नागपूर जिल्ह्यात कार्यान्वित झाला असून यामध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना जिल्हा प्रशासनाने आमंत्रित केले आहे. जिल्ह्यातील ज्या संस्थांना या लोकोपयोगी अभियानात सहभागी व्हायचे आहे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा ई मेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.

मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे व उपलब्ध भुजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यात येणार आहे. समाजातील सर्वच घटकांनी प्रशासनाला साथ देत टंचाईमुक्त महाराष्ट्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

अतुल पांडे

माहिती अधिकारी

जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर