अमरावती, दि. 17 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विविध ग्रामविकासाची कामे केली जातात. ग्रामपंचायत ही मनरेगा योजनेचा केंद्रबिंदू असल्याने विविध सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी म्हणून मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीत स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन शेतकऱ्यांना व गरीब कुटुंबांना समृद्ध करण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्न करावा, असे आवाहन रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी आज येथे केले.
मनरेगा व भारत रुरल लाईव्हलीहूड फाउंडेशन (BRLF) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे करण्यात आले आहे. आज या कार्यशाळेचा शुभारंभ श्री. नंदकुमार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. मनरेगा आयुक्त शान्तनु गोयल, उपसचिव (रोहयो) श्रीमती संजना खोपडे, राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश काळे, भारत रुलर लाईव्हलीहूड फाउंडेशचे कार्यक्रम अधिकारी तथा तांत्रिक सल्लागार सुमित रॉय यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. नंदकुमार म्हणाले की, महात्मा गांधी नरेगा योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर वैयक्तिक लाभाची व सार्वजनिक स्वरुपाचे विविध कामे पूर्ण केली जातात. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून महाराष्ट्रातील प्रत्येक गाव ‘मागेल त्याला कामे नव्हे तर हवे ते काम देऊन’ सर्व कुटुंबाना सुविधासंपन्न होऊ शकतात. ग्रामसमृद्धी करण्याचा ध्यास शासनाने हाती घेतला आहे. मनरेगा योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कामांचे दशवार्षिक नियोजन करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर शाश्वत स्वरूपाची मालमत्ता निर्माण करून व्यक्ती व गावाच्या समृद्धीवर भर देण्यात येत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही तळागाळातील वंचित घटकांसाठी, लोककेंद्रित, मागणीप्रदान, कामाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि रोजगाराचा हक्क म्हणून तयार केलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण शेतकरी, शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा, महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आणि पंचायत राज संस्थांना बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारत रुलर लाईव्हलीहूड फाउंडेशन (BRLF) या स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने तसेच इतर सामाजिक संस्थांनीही एकत्र येऊन योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या विविध कामांच्या नियोजन ते अंमलबजावणीपर्यंत सहकार्य करून कुटुंबाना सुविधासंपन्न व गावाच्या सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येयपूर्तीस सहकार्य करावे, असे आवाहनह श्री. नंदकुमार यांनी यावेळी केले.
मनरेगा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून ग्रामसमृध्दी यावर तज्ज्ञांकडून सविस्तर चर्चा व मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.