शाळा आणि अंगणवाड्यांची कामे त्वरित पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

0
7

पुणे, दि. ३१ : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली शाळा आणि अंगणवड्यांची कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शाळा वर्गखोली, स्वच्छतागृह बांधकाम, पिण्याचे पाणी, वाचनालय आदी सुविधांच्या प्रस्तावित ४०० कामांची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करण्यात यावी. १५ जूनपर्यंत कामांना सुरुवात करण्यात यावी. मनरेगा, स्वच्छ भारत अंतर्गत काम करणाऱ्या यंत्रणांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल.

बांधकामासाठी जागा उपलब्ध असलेल्या अंगणवाडी कामाबाबत गावनिहाय माहिती सादर करावी व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अपेक्षित खर्च सादर करण्यात यावा. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल. जुलैच्या प्रारंभी शाळा व अंगणवाडी कामांचा आढावा घेण्यात येईल. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठीचा प्रस्तावही सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

पावसाळ्यात साथजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पावसाळ्याच्या कालावधीत रजेवर जाऊ नये याबाबत सूचना द्याव्यात, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री. वाघमारे यांनी गतवर्षी झालेल्या शाळा, अंगणवाडी बांधकाम तसेच रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here