महिला अत्याचाराच्या तक्रारीबाबत संवेदनशील राहावे – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 31 : महिलांच्या सुरक्षेबाबत जास्तीत जास्त भर देऊन महिला अत्याचाराच्या तक्रारींची संवेदनशील राहून सखोल चौकशी करावी, दोषींवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात एच पूर्व वॉर्ड सांताक्रूझ (पूर्व) येथे आज ५७८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १५४ तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारीदेखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, कलिना शास्त्रीनगरमध्ये इमारत पुनर्विकासासाठी नवीन विकासक नेमण्यात यावा, प्रभात कॉलनी येथे सहा वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

श्रीमती अनुराधा रोकडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/