मुंबईची पारंपरिक संस्कृती जतन करणार – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. १ : मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. येथे अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. या सर्व परिसराचे सुशोभिकरण करून पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या कामांच्या प्रगतीचा शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आढावा घेतला. या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईची पारंपरिक संस्कृती जतन केली जाणार असून ही कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

मुंबई शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सुशोभिकरणाच्या कामांच्या सद्यस्थितीचा पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले, मुंबईमध्ये पर्यटन वाढीसाठी मोठी क्षमता आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सुशोभिकरणाची जी कामे सुरू आहेत ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच ज्या कामांच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी आवश्यक आहे ती तातडीने घ्यावी.

मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, कोळीवाडे, माहिम रेती बंदर ते दादर चौपाटीपर्यंत सी साईड वॉक वे, वरळी समुद्र किनाऱ्यावरील इमारतींवर लाईट आणि लेझरद्वारे रोषणाई, तेथील सुशोभीकरण, शिवतीर्थ येथील परिसराचे सुशोभीकरण, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या इमारतींची दुरूस्ती आणि सुशोभीकरण, खोताची वाडी येथे पारंपरिक पद्धतीने जतन आणि संवर्धन आदी प्रकल्पांबाबत या बैठकीत सादरीकरण करण्यात आले.

000

बी.सी.झंवर/विसंअ/