कोल्हापूर, दिनांक 4 (जिमाका):- राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा महासंकल्प केलेला आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 11 जून 2023 रोजी कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केलेला असून जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुख यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी व दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात शासन आपल्या दारी कार्यक्रम पूर्वतयारी आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, तहसीलदार स्वप्निल पवार व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, अकरा जून रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या सर्व भागातून येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवावी. लाभार्थ्यांची ने-आण करणे, नाष्टा-पाणी, जेवण ओआरएस पावडर या बाबींचे योग्य ती व्यवस्था करावी व ते सर्व वेळेवर व जागेवर लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. तसेच कार्यक्रम संपल्यानंतरही त्यांच्या गावापर्यंत व घरापर्यंत लाभार्थी वेळेवर पोहोचेल याबाबतचे सूक्ष्म नियोजन प्रशासनाने करावे असेही त्यांनी सूचित केले.
तपोवन मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यक्रमाचे नियोजन तसेच शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल, आरोग्य विभागाचा कॅम्प तसेच पार्किंगची व्यवस्था याबाबत प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. प्रत्येक तालुक्याला लाभार्थी योजनेचे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड करावी व जिल्ह्याला देण्यात आलेल्या 75 हजार पेक्षा अधिक लाभार्थी निवड करून त्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल याची संपूर्ण खबरदारी प्रशासनाने पार पाडावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या.
प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासन आपल्या दारी उपक्रमासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यामध्ये प्रशासनाने दिनांक 31 मे अखेरपर्यंत जवळपास सव्वा लाख लाभार्थ्यांची निवड केलेली होती. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार पुन्हा 75 हजार लाभार्थी निवडून त्यांना लाभ देण्यासाठी प्रशासनाने मोहीम हाती घेतली असून कार्यक्रमापूर्वी 75 हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड करून त्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थी आणणे व त्यांना त्यांच्या गावी सोडणे यासाठी तालुक्याला प्रत्येकी 60 बसेस देण्यात येणार आहेत तर गगनबावडा तालुक्यासाठी 35 बसेस देण्याचे नियोजन केलेले आहे. याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून अडीच ते तीन हजार लाभार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. लाभार्थी ने-आण करणे, नाष्टा-पाणी व जेवण तसेच वाहनाच्या पार्किंगची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली असून एकाही लाभार्थ्यांला कोणतीही अडचण येणार नाही याकरिता प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून शासन आपल्या दारी उपक्रमाचे प्रशासनाच्या वतीने यशस्वी आयोजन केले जाणार असल्याची माहिती श्री. रेखावार यांनी दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, कौशल्य विभागाचे संजय माळी यांनी त्यांच्या विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत केली. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अमोल शिंदे व विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांची ही उपस्थिती होती व त्यांनीही कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले व सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेले उद्देश पूर्ण करून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले.
00000