वारस नोंद लावण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात विशेष मोहीम – पालकमंत्री उदय सामंत

0
10

रत्नागिरी दि ५ ( जिमाका):- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपण कटिबद्ध असून याचे दृश्य परिणाम नागरिकांना लवकरच दिसून येतील त्यासाठी नागरिकांनी थोडा संयम ठेवावा. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वारस नोंदीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वारस नोंद लावण्याबाबत दिनांक 12 ते 30 जून या कालावधीत तहसीलदारांच्या सहायाने एक विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या अल्पबचत सभागृहात आज ‘जनता दरबाराचे’ आयोजन करण्यात आले होते.  यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालिका श्रीमती नदिनी घाणेकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्री. ओटवणेकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या तक्रारदारांच्या अडचणीची सोडवणूक पालकमंत्र्यांनी अतिशय आस्थेवाईकपणाने केली.

पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यातील सध्या सुरु असलेल्या विकास कामांची प्रक्रिया थांबता कामा नये तसेच जिंदाल उद्योग समूहाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.  त्याचबरोबर जिल्ह्यातील विकास कामे सुरू असताना त्याच्या आड येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा मुलाहिजा ठेवण्यात येवू नये.  विकास कामांच्या आड येणाऱ्यांवर पोलीस विभागांनी कडक कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

जिल्ह्यातील सुमारे पन्नासहून अधिक अर्जदारांनी या जनता दरबारात आपल्या तक्रारी मांडल्या.   त्यातील 35 हून अधिक तक्रारींची दखल पालकमंत्र्यांनी तत्काळ घेत जागेवरच तक्रारदारांच्या प्रश्नांची सोडवणूक केली.  तत्पूर्वी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या जनता दरबाराची स्थिती सांगताना ते म्हणाले, मागील जनता दरबारात जिल्हा प्रशासनाला सुमारे 303 अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी 278 अर्ज कार्यवाहीसाठी ठेवण्यात आले होते त्यातील 268 अर्ज प्रशासनाने निकाली काढून संबंधितांना जिल्हा प्रशासनाने न्याय दिला.

चौकट:

नोव्हेंबर २०२२ मध्ये पार पडलेल्या जनता दरबारात शासकीय अधिकाऱ्यांकडून तक्रारदारांचे 278 पैकी 268 अर्ज निकाली काढण्यात आल्यामुळे पालकमंत्र्यांनी शासकीय यंत्रणेची पाठ थोपटली. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने रत्नागिरीमध्ये हेल्मेट सक्ती करण्याऐवजी हेल्मेट वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यावर भर द्यावा अशी सूचना केली.

या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील इतर तालुक्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या जनता दरबाराद्वारे संबंधितांचे जागेवर प्रश्न सोडवण्याची पालक मंत्र्यांची ही हातोटी बघून नागरिक अत्यंत समाधानी चेहऱ्याने या जनता दरबारातून परतत होते.

लांजा येथेही जनता दरबाराचे आयोजन

अल्पबचत सभागृह येथील जनता दरबार आटोपून आज दुपारी दोनच्या सुमारास पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथे राजापूर व लांजा तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबार घेतला यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, राजापूरच्या प्रांताधिकारी श्रीमती वैशाली माने, लांजाचे तहसीलदार प्रमोद कदम, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत खेडगे, नगराध्यक्ष मनोहर बाईत आदी उपस्थित होते.

या जनता दरबारामध्ये सुमारे 35 हून अधिक नागरिकांनी आपली निवेदने प्रशासनासमोर मांडली. ही सर्व प्रकरणे निकाली काढून संबंधित विभागाने तक्रारदारांना न्याय द्यावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.

पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री उदय सामंत

जागतिक तापमान वाढीचा आणि वाढत्या प्रदुषणाचा विचार करता, पर्यावरणाचे रक्षण करणे हे आवश्यक आहे. किंबहुना प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्यच आहे. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड अत्यंत गरजेची आहे. त्यादृष्टीने कादंळवन जतन व लागवड करणे अतिशय महत्वाचे आहे असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

मौजे आरे येथे वनविभाग महाराष्ट्र शासन व कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण  दिनानिमित्त कांदळवन रोपवन लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रत्नागिरीचे प्रांतधिकारी विकास सुर्यंवशी, विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, रत्नागिरीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, आरे काळबादेवी सरपंच तृप्ती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, कांदळवन हे इतर यंत्रणेपेक्षा सहापट कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषून घेऊन तेवढयाच पटीने ऑक्सीजन बाहेर टाकते. कोविड सारख्या रोगांवरही कांदळवन लागवड व जतन करुन प्रतिबंध करता येऊ शकते.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कांदळवनाची संकल्पना समजली पाहिजे. कांदळवन लागवड व विकसीत का करतो आहोत? हे विद्यार्थ्यांना समजणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थी तसेच नागरिकांना कांदळवन लागवडीमध्ये पुढाकार घ्यावा यासाठी वन विभागाने पुढाकार घ्यावा अशा सूचना करुन ते म्हणाले, रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासाकरिता  आपण कटिबद्ध असून मुलांमध्ये विज्ञानाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे या हेतूने रत्नागिरी येथे तारांगण उभे करण्यात आले. कोकणातील पहिले प्राणी संग्रहालय मालगुंड येथे 50 एकर जागेवर होत आहे. बर्ड पार्क, स्नेक पार्क, साऊथ अफ्रिकेशी अथवा जयपूरशी टायअप करुन पांढऱ्या रंगाचा पाढंरा पटेरी वाघ आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे नक्कीच पर्यटक वाढतील आणि ते वाढल्याने येथील रोजगार वाढेल. सिंधुरत्न योजनेतून यासाठी 75 कोटीचा निधी देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच पुढील जागतिक पर्यावरण दिनी प्राणी संग्रहालय सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तत्पूर्वी विभागीय वन अधिकारी दिपक खाडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.

जलजीवन मिशन आढावा बैठक

कांदळवन रोप लागवडपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे सकाळी 8.30 च्या सुमारास जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली आणि प्रलंबित कामे  ही उत्तम गुणवत्तेची आणि वेळवर पूर्ण करा अशी सूचना केली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कीर्ती किरण पुजार, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.

——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here